
माझ्या पक्षामध्ये दोन मतप्रवाह आहेत. एका गटाचं म्हणणं आहे की प्रत्येक पक्षाने आपल्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी आणि निवडणूक झाल्यावर एकत्र बसावं. तर दुसऱ्या गटाचं म्हणणं आहे की, आपण सरकार एकत्र चालवतो. जर एकत्र निवडणूक लढवली तर सरकारच्या दृष्टीकोनातून चांगलं राहील. पण याबाबत आमचा निर्णय झालेला नाही.
प्रार्थनास्थळे भावनांची केंद्रे
यावेळी शरद पवारांना राज ठाकरेंचा अयोध्या दौरा आणि त्याला भाजप खासदाराकडून होणाऱ्या विरोधासंबंधी विचारण्यात आलं. त्यावर शरद पवार म्हणाले, हा काही राष्ट्रीय प्रश्न नाही. माझा नातूही काल अयोध्येत होता.दरम्यान राज्यात सध्या भोंग्यावरुन सुरु असलेल्या राजकारणावर बोलताना ते म्हणाले की, कोणाचं आर्थिक नुकसान होत नाही, पण भावनांचा प्रश्न आहे. शिर्डीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सकाळी प्रार्थना होते. या निर्णयामुळे ती प्रार्थना बंद झाली. लोक हे चालू करा सांगत आहेत. काही लोकांची भावनेची केंद्रं असतात. अनेक काळापासून सुरु असलेल्या पद्धती सुरु राहाव्यात, असं त्यांना वाटत असतं. एखाद्या गोष्टीमुळे त्या बंद झाल्या तर त्याचे परिणाम दिसतात आणि महाराष्ट्रात ते उमटू लागले आहेत, असे ते म्हणाले.
मोदी सरकावर निशाणा
आतापर्यंत लोकांच्या प्रश्नासाठी चळवळी व्हायच्या. हनुमान चालिसा वैगेरे गोष्टी होत नव्हत्या. सामान्य लोकांचे प्रश्न महागाई, बेकारी, कायदा-सुव्यवस्था आहेत. हे सगळे प्रश्न बाजूला राहिले आणि अयोध्येच कायं झालं, प्रार्थना म्हणा सुरु आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे त्यांना मुलभूत प्रश्न सोडवण्यात अपयश आलं असल्याने लोकांचं लक्ष वळण्यासाठी या सगळ्या गोष्टींना प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतली जात आहे, असं सांगत शरद पवारांनी मोदी सरकावर निशाणा साधला.