बाबुर्डी, भातोडी ग्रामपंचायतीवर कर्डीले गटाचे वर्चस्व ; पिंपळगाव उजनीत तनपुरे गटाचा शिरकाव

  नगर तालुका : नगर तालुक्यातील बाबुर्डी, भातोडी ग्रामपंचायतीवर कर्डीले गटाचे वर्चस्व प्रस्थापित झाले असून पिंपळगाव उजनी ग्रामपंचायतीमध्ये तनपुरे गटाचा शिरकाव झाला असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

  नगर तालुक्यातील भातोडी, बाबुर्डी घुमट व पिंपळगाव उज्जैनी या तीन गावच्या ग्रामपंचायतीची निवडणूक (गुरूवारी) शांततेत झाली. यामध्ये ८८ टक्के मतदान झाले. या निवडणुकीचा निकाल शुक्रवारी (दि.५) लागला. चुरसीच्या निवडणुकीमुळे निकालाची उत्सुकता वाढली होती. तहसील कार्यालयात मतमोजणी झाल्यानंतर तिन्ही गावांचे निकाल हाती आले. यामध्ये नगर तालुक्यातील बाबुर्डी घुमट ग्रामपंचायतीच्या ९ जागांसाठी १९ उमेदवार रिंगणात होते. यामध्ये कर्डीले गटाच्या सहा जागा निवडून आल्या असून विजयी उमेदवारांमध्ये तान्हाजी परभणे, नमिता पंचमुख ( सरपंच ), वंदना चव्हाण, पवन लांडगे, ज्योती परभणे, शहाबाई मुंजाळ तर महाआघाडीच्या तीन जागा निवडून आल्या असून यामध्ये जनार्धन माने, ज्योती फसले, मैनाबाई परभणे यांचा समावेश आहे.

  सरपंचपद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने, या जागेसाठी दोन्ही पॅनेलच्या उमेदवारांविरोधात एक महिला अपक्ष म्हणून उभी ठाकली होती. यामुळे चुरस वाढली होती. बाबुर्डीत सर्वाधिक ९२ टक्के मतदान झाले.

  भातोडीतही कर्डीले गटाला सहा जागा
  ही निवडणूक महाविकास आघाडी विरुध्द भाजप म्हणजेच माजी आमदार शिवाजी कर्डिले समर्थकांमध्ये रंगली. तर भातोडी गावातही ९ जागांसाठी २१ उमेदवार रिंगणात होते. यामध्ये कर्डीले गटाच्या सहा जागा तर महाआघाडीच्या तीन जागा निवडून आल्या. विजयी उमेदवारांमध्ये सुभाष कचरे, सुनीता गायकवाड, सुनीता लबडे, लक्ष्मण लबडे, ज्योती लबडे, कैलास गांगर्डे, राजू पटेल, मुमताज मुलानी, उलफत पटेल यांचा समावेश आहे. दोन प्रभागात दुरंगी, तर एका प्रभागात तिरंगी लढत झाली असून गावात ८३ टक्के मतदान झाले.

  पिंपळगाव उज्जेनीत तनपुरे गटाचा शिरकाव
  पिंपळगाव उज्जेनीमध्ये सहा कर्डीले गटाला व पाच जागा तनपुरे गटाला मिळाल्या असल्यातरी या ग्रामपंचायतीत तनपुरे गटाचा शिरकाव झाला असल्याचे चित्र पाहायला मिळाले. विजयी उमेदवारांमध्ये राहुल आल्हाट, शांताबाई आढाव, गोरक्षनाथ वाघ, रेखा आल्हाट,लैंल्याबाई शेख, अतुल वामन, अशोक आढाव, मोनिका आढाव, कानिफनाथ आढाव, मंगल वाघ, सुरेखा मगर यांचा समावेश आहे.