अमरावतीमध्ये आज बच्चू कडूंचा मेळावा, रवी राणासोबतच्या वादावरची भूमिका स्पष्ट करणार?

रवी राणा यांनी काल दिलगिरी व्यक्त करत आपलं वक्तव्य मागे घेतलं होतं. तसेच बच्चू कडू यांनी त्यांच्याबाबत वापरलेले शब्द मागे घ्यावेत असंही रवी राणा यांनी म्हटलं आहे.

    अमरावती : अमरावतीमध्ये आज आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu)यांच्या उपस्थितीत आज प्रहार संघटनेचा मेळावा होणार आहे. आमदार रवी राणा यांच्या सोबत झालेल्य वादानंतर बच्चू कडू आपली भूमिका स्पष्ट करणार अशी शक्यता वर्तवली जात होती. आज या मेळाव्याच्या माध्यमातुन रवी राणाबाबतच्या वादावर ते नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे. तर, ज्या ठिकाणी मेळावा होणार आहे, त्या ठिकाणी ‘मै झुकेगा नही’ चे पोस्टर लावण्यात आहे. त्यामुळं विविध चर्चांना उधाण आलं आहे.

    मागील काही दिवसांपासून आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात टोकाचा वाद सुरु होता. त्यावर आता पडदा पडला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत रवी राणा (Ravi Rana) यांनी जवळपास अर्धा तास चर्चा केली. त्यानंतर रवी राणा यांनी बच्चू कडू (Bacchu Kadu) यांची जाहीर माफी मागितली आहे. मात्र, या आरोेर प्रत्त्यारोपानंतर बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. रवी राणांना या आरोपाबाबत पुरावे सादर करण्याचे आव्हान दिले होते. तर यासाठी  रवी राणांना एक नोव्हेंबरचा अल्टीमेटम दिला होता. तो अल्टीमेटम आज संपत आहे. अद्याप रवी राणांनी याबाबत कोणतेही पुरावे सादर केले नाहीत. फक्त दिलगिरी व्यक्त करत आपले शब्द मागे घेतले आहेत. त्यानंतर आज बच्चू कडू त्यांची भूमिका मांडणार आहेत. एक नोव्हेंबरपर्यंत माझ्यावर केलेल्या आरोपाचे पुरावे सादर केले नाहीत तर आपण कोर्टात धाव घेणार असल्याचंही आमदार बच्चू कडू यांनी सांगितलं होतं.