बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचा दणका, आंदोलनानंतर बँकेने शेतकऱ्यांच्या जमिनींची लिलाव प्रक्रिया ढकलली पुढे

शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी गहाण ठेवून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज घेतले होते. मात्र अनेक कर्जखातेधारकांनी कर्जाची परतफेड केली नाही. बँकेकडून गहाण असलेल्या मालमत्तांचे लिलाव करण्याची प्रक्रिया सुरु झाली होती. यासंदर्भात अनेक कर्जदारांना नोटीसही बजावण्यात आली होती. बँकेने ही लिलाव प्रक्रिया थांबवावी, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाने केली होती.

नागपूर: नागपुरातील (Nagpur) महाल परिसरातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत प्रहारतर्फे आंदोलन करण्यात आले. लिलावात शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी करणाऱ्यांचे हातपाय तोडू असा इशारा आमदार बच्चू कडू (MLA Bachchu Kadu) यांनी आंदोलनाच्या वेळी दिला आहे. तसेच प्रहारच्या (Prahar) आंदोलनानंतर कर्ज थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनींची लिलाव प्रक्रिया बँकेकडून अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.

शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी गहाण ठेवून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज घेतले होते. मात्र त्यापैकी अनेक कर्जखातेधारकांनी कर्जाची परतफेड केली नाही. बँकेकडून गहाण असलेल्या मालमत्तांचे लिलाव करण्याची प्रक्रिया सुरु झाली होती. यासंदर्भात अनेक कर्जदारांना नोटीसही बजावण्यात आली होती. बँकेने ही लिलाव प्रक्रिया थांबवावी, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाने केली होती.

जिल्हा मध्यवर्ती बँकेने काही दिवस लिलाव प्रक्रिया पुढे ढकलल्यानंतर पुन्हा एकदा लिलाव प्रक्रिया सुरु केल्यामुळे आजची लिलाव प्रक्रिया उधळून लावण्यासाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.

बच्चू कडू आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांसह जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमधील आंदोलनानंतर बँकेने आज जाहीर केलेला शेतकऱ्यांच्या गहाण जमिनीचा लिलाव अनिश्चित काळासाठी पुढे ढकलला आहे. यासंदर्भात तोडगा काढण्यासाठी लवकरच जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली जाणार आहे. त्यानंतर कर्ज प्रकरण आणि लिलाव संदर्भात निर्णय घेतला जाईल, अशी माहिती बँकेचे कार्यकारी अधिकारी चितरंजन नाईक यांनी दिली.

निसर्गाचे कोप, सततची नापिकी आणि काही करुन उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला तर शेतमालाला मिळणारे अल्पदर यामुळे शेतकरी आधीच हवालदिल झाला आहे. कर्जाच्या डोंगराखाली शेतकरी दबला आहे. या तणावामुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. अशा परिस्थितीत अन्न देणाऱ्या बळीराजाला साथ देण्याची गरज असताना बँकांकडून त्यांच्या जमिनीही हिसकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही बाब आम्ही खपवून घेणार नाही. त्यामुळे बँकेने माणूसकीने विचार करुन कठोर भूमिका घेणे टाळावे असे आवाहनही यावेळी बच्चू कडू यांनी केले आहे.

राज्य सरकारच्या कर्जमाफीसंदर्भात बच्चू कडू म्हणाले, “आतापर्यंत एकवेळा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना आणि उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना अशी दोनवेळी कर्जमाफी झाली आहे. मात्र त्यातील जाचक अटींमुळे हजारो शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे या दोन्ही कर्जमाफी एकत्र करुन सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ मिळावा यासाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही भेटणार आहे.”