चंद्रभागा नदीला प्रदूषणाचा ‘विळखा’; पाण्याला दुर्गंधीयुक्त हिरवा तवंग

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या भीमा नदीला सध्या प्रदूषणाने ग्रासले आहे. कधी काळी काचेसारखे चमकणाऱ्या पाण्याचा रंग पार बदलून गेला आहे.

  पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या भीमा नदीला सध्या प्रदूषणाने ग्रासले आहे. कधी काळी काचेसारखे चमकणाऱ्या पाण्याचा रंग पार बदलून गेला आहे. पिण्यासाठी तर सोडाचं पण हे पाणी आता काही दिवसांत शेतीसाठी सुद्धा उपयोगी राहणार नाही, असे मत काही जलप्रदुषणावर अभ्यास करणाऱ्या जलतज्ञांनी व्यक्त केले आहे.

  जिल्ह्याची वरदायिनी भीमा नदी आहे. दुष्काळी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सोलापूर जिल्ह्याचे नंदनवन उजनी धरणामुळे झाले आहे. हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले असून, शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले आहे. तर हेच उजनी धरण शेतकऱ्यांच्या अर्थिक प्रगतीचा कणा बनले आहे. म्हणून उजनीला शेतकऱ्यांसाठी वरदायनी म्हटले जाते.

  पुणे जिल्ह्यातील भीमेच्या उगमापासून अनेक नद्या एकत्र येऊन भीमा सारखी महाकाय नदीचे रुप उदयाला आले. यातील काही नद्या पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातून येतात. ही दोन्ही शहर देशात उद्योग आणि शहरीकरणात झपाट्याने वाढलेली शहरे म्हणून यांची ओळख आहे. या शहरांचे नागरीकरण जेवढ्या झपाट्याने झाले, तेवढ्याचं झपाट्याने उद्योगही वाढले.

  ही सर्व क्रांती होत असताना नद्यांचे नाले कधी झाले हे प्रशासनाच्या लक्षात आलेच नाही. किंबहुना त्याकडे लक्षच दिले नाही. उद्योगाचे आणि नागरिकरणातील अशुद्ध पाणी थेट नदी पात्रात मिसळते. दररोज सुमारे दीडशे ते दोनशे मेट्रीक टन मलमुत्र नदीच्या माध्यमातून उजनीच्या पाण्यात येते. वास्तविक पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरापुरते आता नागरीकरण मर्यादित राहिलेले नाही. तर ते आता पुण्याच्या चाळीस किलोमीटर परिसरात पसरले आहे. रोजच्या रोज नागरिकरणात होत असलेली वाढ आणि त्यापासून होणारे प्रदूषण चिंता करणारे आहे.

  दुषित पाण्यामुळे मच्छिमारांना त्वचा रोगाची समस्या

  भीम नदी पाण्याच्या प्रदूषणाची पातळी एवढी वाढली आहे की, पाण्याला दुर्गंधी येते. नदीमध्ये भाविक भक्तांनी अंघोळ केली तर सर्व अंगाला खाज येते तसेच शरीराला लालाचट्टे पडून बारीक पुरळ येतात. मच्छिमारांच्या हातांना व पायाला जखमा होऊ लागल्या आहेत. शेतजमिनीवर तेलाचे तवंग दिसतात तर पाण्यात मलमुत्रापासून तयार झालेल्या गॅसच्या बुडबुड्या दिसतात. भीमा नदीवरील वाढते पाणी प्रदूषण चिंतेचा विषय बनले आहे.

  नदीच्या पाण्यावर पुण्यासह बारामती व भीमा नदी परिसरातील मातब्बर राज्यकर्त्यांनी अनेक उद्योगधंदे, साखर कारखाने, केमिकलयुक्त कंपन्या व इतर छोटे-मोठे उद्योग आणून बसवले आहेत. संबंधित कंपन्यांमधून निघणारे प्रदूषित पाणी मोठ्या टाकीत साठवून ठेवून पावसाळ्यात नजीकच्या ओढ्या नाल्यांना सोडून दिले जाते. ते प्रदूषित पाणी नंतर नदीच्या पाण्यात मिसळून प्रदूषण वाढल्याने हे पाणी पशुपक्षी तसेच प्राणी व माणसाला पिण्यायोग्य झाले असून, आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

  संबंधित कंपनीवर कारवाई करण्याची मागणी

  चंद्रभागा नदीच्या पाण्याचे काही शास्त्रज्ञांनी संशोधन केले असता प्रत्येकी ३० व्यक्तींपैकी एका व्यक्तीस कॅन्सर असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. तरी यावरती प्रशासनाने त्वरित पाऊले उचलावीत असे सर्वसामान्य नागरिकांनी मत व्यक्त केले आहे. नदीपात्रात केमिकलयुक्त रसायन व पाणी सोडणाऱ्या कंपनीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.