पैशांचा पाऊस पाडण्याच्या आमिषाने १८ लाखांची बॅग लंपास, हडपसर परिसरातील प्रकार; 4 जणांवर गुन्हा दाखल

पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून एकाची १८ लाख रुपयांची बॅग पळवून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भोंदूबाबा सह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पुणे : पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून एकाची १८ लाख रुपयांची बॅग पळवून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भोंदूबाबा सह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याघटनेने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. याबाबत विनोद छोटेलाल परदेशी (रा. रामनगर, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

    यावरुन बाबा आयरा शाब, माधुरी मोरे, रॉकी वैद्य, किशोर पांडागळे यांच्यावर भादवी कलम ४२०, ४०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ३ ऑक्टोबर २०२३ रोजी रात्री साडे आठच्या सुमारास ससाणेनगर येथे घडला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा प्लॅस्टींगचा व्यावसाय आहे. यादरम्यान, आरोपींनी आपआपसांत संगनमत करुन तक्रारदार यांना पैशांचा पाऊस पाडतो ते पैसे डब्बल किंवा तीनपट देखील होईल असे खोटे सांगितले. त्यांचा विश्वास संपादन करून पैशांचा पाऊस पाडून पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी तक्रारदारांना ससाणेनगर येथील युनिव्हर्सल शाळेशेजारी राहणाऱ्या विशाल बिनावत यांच्या घरी बोलावून घेतले.

    तेव्हा त्यांना ३ ऑक्टोबर २०२३ रोजी रात्री १८ लाख रुपये घेऊन बोलावले. तक्रारदारांनी मित्र तसेच नातेवाईक यांच्याकडून उसने पैसे जमा केले. आरोपींनी सांगितल्यानुसार संबंधिताच्या घरी आले. आरोपींनी त्यांची नजर चुकवून १८ लाख रुपयांची बॅग पळवून नेली. अधिक तपास सहायक निरीक्षक विजयकुमार शिंदे करीत आहेत.