Bageshwar Baba's satsang

  पुणे : बागेश्वर बाबा (धीरेंद्र शास्त्री) यांनी जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे. त्याचबरोबर संत तुकाराम यांच्याविषयी केलेल्या विधानाबद्दलही त्यांनी माफी मागितली आहे. संताचा अपमान करण्याचा विचार मी कधीच करू शकत नाही, असेही त्यांनी नमूद केले.
  पुण्यात तीन दिवसीय सत्संग आणि दरबाराचे आयोजन
  संगमवाडी येथे बागेश्वर बाबा यांचा तीन दिवसीय सत्संग आणि दरबाराचे आयोजन केले आहे. या दरम्यान, बागेश्वर बाबा यांनी बुधवारी देहू येथे जाऊन संत तुकाराम महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी माजी आमदार जगदीश मुळीक, संजय महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, प्रल्हाद महाराज मोरे, नितीन महाराज मोरे, विश्वजीत महाराज मोरे, विक्रम महाराज मोरे आणि देवस्थानाचे सर्व विश्वस्त आणि संत तुकाराम महाराजांचे वंशज उपस्थित होते.
  तुकाराम महाराजांच्या प्रसिद्ध शिळेचे दर्शन
  आज मला संपूर्ण देवस्थानचे व तुकाराम महाराजांच्या प्रसिद्ध शिळेचे दर्शन घडले. इंद्रायणी नदीमध्ये बुडालेली तुकाराम गाथा त्यांनी त्यांच्या तपोबलाच्या सामर्थ्याने पुन्हा वर आणली होती. हेच आमच्या भारतातील संत परंपरेचे सामर्थ्य आहे. भारत हा अद्भुत देश आहे. भारतातील सर्व संतांचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहिला तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे महाराष्ट्र हिंदू राष्ट्र स्थापन करायचे जे स्वप्न होते  ते संपूर्ण भारतामध्ये साकार होईल आणि संपूर्ण भारत हिंदू राष्ट्र होईल.
  भारतीय संतांचा अपमान करण्याचा विचारही करू शकत नाही
  मी स्वतः आचार्य संप्रदायाचा चेला असून मी कधीही भारतीय संतांचा अपमान करण्याचा विचारही करू शकत नाही. गैरसमजातून जी गोष्ट झाली आणि त्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये जो दोष उत्पन्न झाला त्याबद्दल मी मनापासून खेद व्यक्त करतो माफी मागतो’’ असे बागेश्वर बाबा समाधीचे दर्शन घेतल्यानंतर म्हणाले.
  मुळीक म्हणाले, ‘महाराष्ट्राला संतांची, वीरांची, छत्रपती शिवाजी महाराजांची परंपरा आहे. आज धीरेंद्र शास्त्री यांनी देहू येथील संत तुकाराम यांचे दर्शन घेतले ही अत्यंत आनंदाची बाब आहे.