दरबारात येऊन दूध का दूध पाणी करा; बागेश्वर बाबांचे ‘अंनिस’ला खुले आव्हान

अंधश्रद्धा निर्मूलनचे काही आक्षेप असतील तर त्यांनी माझ्या दरबारात यावे, त्यांना कोणीही अडवणार नाही, आपलं एकदा आमने-सामने होऊन जाऊ द्या असे आव्हानच आचार्य धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांनी दिले आहे.

    पुणे : अंधश्रद्धा निर्मूलनचे काही आक्षेप असतील तर त्यांनी माझ्या दरबारात यावे, त्यांना कोणीही अडवणार नाही, आपलं एकदा आमने-सामने होऊन जाऊ द्या असे आव्हानच आचार्य धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांनी दिले आहे. त्याचवेळी त्यांनी संत तुकाराम यांच्याविषयी केलेल्या विधानावर माफी मागितली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीलाही त्यांनी पाठींबा दिला आहे.

    पुण्यात जगदीश मुळीक फाऊंडेशनच्या वतीने बागेश्वर बाबा यांचा सत्संग आणि दरबाराचा कार्यक्रम तीन दिवस आयाेजित केला गेला आहे. या कार्यक्रमाला अंधश्रद्धा निर्मुलन समितीने विराेध केला आहे. यापार्श्वभुमीवर पत्रकार परीषदेत बागेश्वर बाबा यांनी त्यांची भुमिका मांडली. भारताला हिंदू राष्ट्र करण्यासाठी संविधानामध्ये बदल केला पाहिजे, असे मतही त्यांनी यावेळी मांडले.

    ‘‘सत्संगामध्ये बोलत असताना एका शब्दाचे अनेक अर्थ निघतात. त्याप्रमाणे कोण कोणता शब्द घेतो त्यावरून त्याची भूमिका ठरते. मी कधीही रावणाशी फोनवर बोललेलो नाही. पण कथा सांगताना उदाहरण म्हणून दृष्टांत दिला जातो. त्या अर्थाने मी बोललेलो आहे. तसेच आजार बरे करण्यासाठी रुग्णालयात गेलेच पाहिजे. अंधश्रद्धा निर्मूलनचे काही आक्षेप असतील तर त्यांनी माझ्या दरबारात यावे, त्यांना कोणीही अडवणार नाही, आपलं एकदा आमने-सामने होऊन जाऊ द्या’’ असेही ते म्हणाले.

    ‘‘ हिंदू धर्म आणि सामाजिक जडणघडणीत संत तुकाराम यांचे महत्वाचे याेगदान आहे. त्यांच्याविषयी माझ्या मनात आदर आहे. मला काेणाचेही मन दुखवायचे नव्हते. त्यामुळे मी माफी मागत असुन, वेळ मिळाला तर देहू येथे जाऊन दर्शन घेईल’’ असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना नमूद केले.

    मुळीक यांना फळ मिळणार का?

    पुण्यातून लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी जगदीश मुळीक हे इच्छुक आहेत. त्यासाठी त्यांनी बागेश्वर बाबा यांचा तीन दिवसांचा सत्संग पुण्याच्या आयोजित केलेला आहे.‌ ते खासदार होणार का असा प्रश्न विचारले असता बागेश्वर बाबा यांनी ‘‘ते जे प्रार्थना करतील,‌ तीच प्रार्थना माझी असेल, त्यांना यश येईल अशा शब्दात त्यांनी हा मुद्दा टोलवला.