palghar mob lynching

पालघर (Palghar) जिल्ह्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गडचिंचले गावाजवळ १६ एप्रिल रोजी चोर-दरोडेखोरांच्या अफवेमुळे गस्त घालणाऱ्या जमावाकडून चोर समजून गुजरातमधील सुरत येथे अंत्यसंस्कारासाठी चाललेल्या दोन साधू आणि वाहन चालकाची हत्या (Palghar Mob Lynching करण्यात आली होती. प्राथमिक तपास पोलिसांकडून करण्यात आल्यानंतर राज्य गुन्हे शाकेकडे वर्ग करण्यात आला होता.

    मुंबई: पालघर जिल्ह्यातील सामुहिक हत्याकांड प्रकरणी (Palghar Mob Lynching Case) मुंबई उच्च न्यायालायाने (Mumbai High Court) १० आरोपींची ओळख न पटल्याने, पुराव्या अभावी २५ हजारांच्या वैयक्तिक जातमुचल्यावर सशर्त जामीन (Bail To 10 Accused Of Palghar Mob Lynching) मंजूर केला. तर अन्य आठ आरोपींचा त्या हल्ल्यात सहभाग असल्याचे पुराव्यांनीशी निष्पन्न होत असल्याचे स्पष्ट करत त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

    पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गडचिंचले गावाजवळ १६ एप्रिल रोजी चोर-दरोडेखोरांच्या अफवेमुळे गस्त घालणाऱ्या जमावाकडून चोर समजून गुजरातमधील सुरत येथे अंत्यसंस्कारासाठी चाललेल्या दोन साधू आणि वाहन चालकाची हत्या करण्यात आली होती. प्राथमिक तपास पोलिसांकडून करण्यात आल्यानंतर राज्य गुन्हे शाकेकडे वर्ग करण्यात आला होता. यादरम्यान, शेकडो जणांना अटक करून आरोपपत्रही दाखल करण्यात आले होते. तसेच उच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान, राज्य सरकारकडून दोन सीलबंद अहवालही न्यायालयात सादर करण्यात आले होते. त्यापैकी काहींना ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. तर काही आरोपींनी उच्च न्यायालयात धाव जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर न्या. भारती डांगरे यांच्यासमोर शुक्रवारी सुनावणी पार पडली. तेव्हा, त्या रात्री ४०० ते ५०० जणांच्या एकत्रितपणे हिंसाचारात सहभाग घेतला. मात्र, अटक करण्यात आलेल्यांपैकी मोहन गावित, इश्वर निकोळे, फिरोज साठे, राजू गुरूड, विजय पिलेना, रिशा पिलेना, दीपक गुरूड, सीताराम राठोड, विजय गुरूड, रत्ना भवर यांची ओळख न पटल्याने त्यांना २५ हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि तेवढ्याच रक्कमेच्या दोघांजणांच्या हमीपत्रावर सशर्त जामीन मंजूर केला. मात्र, प्रकरणाशी संबंधित कोणत्याही व्यक्तिला अथवा साक्षीदाराला प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष भेटण्याचा, धमकी देण्याचा प्रयत्न करू नये, पुराव्यांशी छेडछाड करू नये, अशा विविध अटीशर्तींही घालण्यात आल्या आहेत.

    तर राजेश राव, रामदास राव, भाऊ साठे, हवसा साठे, राजल गुरूड, महेश गुरूड, लहान्या वालकर, संदेश गुरूड या आरोपींची त्या रात्रीच्या सीसीटिव्ही फुटेजमध्ये, तसेच अन्य काही मोबाईल क्लिपर ओळख पटली आहे. त्यांच्यापैकी अनेकांकडे लाकडी काठ्या, लाकूड, कुऱ्हाडी इत्यादी हत्यारे व्हिडिओमध्ये आढळून आली होती. आरोपी पोलिसांच्या वाहनावर दगडफेक करताना आणि मृतांना लाठ्या-काठ्या मारतानाही सीसीटीव्हीमध्ये दिसून आले होते. आरोपी लोकांना जमावात सामील होण्यासाठी आणि तिन्ही साधूंवर हल्ला करण्यासाठी बोलावतानाही दिसले असल्याचेही आपल्या निकालात नमूद करत पुराव्यांच्या आधारावर न्या. डांगरे यांनी आरोपींना दिलासा देण्यास नकार देत याचिका फेटाळून लावली.