दौंडच्या पूर्व भागात बाजरी पीक जोमात ; मक्याचा खर्च परवडत नाही

दौंडच्या पूर्व भागात बाजरी पीक यंदा जोमात आहे. पिकाला खते देण्यासह आंतरमशागतीचे काम वेगात सुरू आहे. पिकाला अनुकूल वातावरण तयार झाल्याने पिकाची चांगली वाढ होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. बाजरी पिकाची पेरणी दौंडच्या पूर्व भागात यंदा वाढली आहे.

    कुरकुंभ : दौंडच्या पूर्व भागात बाजरी पीक यंदा जोमात आहे. पिकाला खते देण्यासह आंतरमशागतीचे काम वेगात सुरू आहे. पिकाला अनुकूल वातावरण तयार झाल्याने पिकाची चांगली वाढ होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. बाजरी पिकाची पेरणी दौंडच्या पूर्व भागात यंदा वाढली आहे.

    मळद, खडकी, रावणगाव, चिंचोली या गावात मोठ्या प्रमाणात पेरणी झाली आहे. पेरणी कमी होईल असे संकेत होते परंतु पेरणी अपेक्षेपेक्षा अधिक झाली आहे. कारण मका पीक अधिक पाणी, खते आदी खर्चामुळे परवडत नसल्याने बाजरी पिकाकडे शेतकरी पुन्हा वळले आहेत. शिवाय सकस चाराही उपलब्ध होत असल्याने बाजरीची पेरणी बऱ्यापैकी झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी पेरणी जुनच्या अखेरीस देखील केली. काही शेतकऱ्यांनी जुलैच्या मध्यात पेरणी केली आहे. सद्यस्थितीत पिकात तण नियंत्रणाचे काम चालू आहे, तर अनेक शेतकरी आंतरमशागत करून खते देत आहेत. युरिया व इतर रासायनिक खतांचा नियंत्रित स्वरूपात उपयोग शेतकरी करीत आहेत. सुरुवातीला पावसाने ओढ दिल्यानंतर पिकाची हवी तशी वाढ दिसत नव्हती. पण, या पंधरवड्यात चांगल्या पावसामुळे वातावणात गारवा निर्माण झाला असून, पीके वाढीस पोषक वातावरण आहे. त्यामुळे मध्यम ते काळ्या कसदार जमिनीत बाजरी पीक जोमात वाढेल, अशी स्थिती आहे.

    शेतकऱ्यांनी पीक विमा भरावा

    सद्या दौंड तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजना खरीप हंगामातील बाजरी व कांदा या पिकासाठी लागू आहे. तरी परिसरातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन पीक विमा भरावा व भविष्यात नैसर्गिक आपत्ती मुळे होणारे आर्थिक नुकसान टाळावे असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने मळद व खडकी येथील कृषी सहाय्यक अझहरुद्दीन सय्यद व अतुल होले यांनी केले आहे.