नांदेड जिल्ह्यात पीकविम्याचा शिल्लक परतावा मिळणे सुरू…

खरीप हंगाम २०२१ मध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या विमाधारक शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती घटकांतर्गत ४६१ कोटींचा पीकविमा परतावा मंजूर झाला होता.

    नांदेड : खरीप हंगाम २०२१ मध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या विमाधारक शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती घटकांतर्गत ४६१ कोटींचा पीकविमा परतावा मंजूर झाला होता. यापैकी ७३ टक्क्यांनुसार ३३० कोटींचा पहिला हप्ता जमा झाला होता. परंतु २७ टक्क्यांनुसार ३३१ कोटींचा विमा रखडला होता. सध्या तो उर्वरित परतावा जमा होत आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांकडून मिळाली.

    खरीप हंगाम २०२१-२०२२ मध्ये जिल्ह्यातील नऊ लाख १० हजार ९४१ अर्जदार शेतकऱ्यांनी उडीद, मूग, तूर, कापूस, ज्वारी व सोयाबीनसाठी ४४ कोटी ९५ लाखांचा विमा हप्ता भरला होता. यात केंद्र व राज्य सरकारकडून प्रत्येकी २९४ कोटी ९२ लाख ४७ हजार ९०१ रुपयांनुसार त्यांचा हिस्सा जमा केला.

    विमा कंपनीकडे एकूण ६३० कोटी ८० लाख ३४८ रुपयांचा विमा हप्ता जमा झाला. या विमा योजनेतून पाच लाख १६ हजार ९५१ हेक्टर क्षेत्र संरक्षित करण्यात आले होते.

    स्थानिक नैसर्गिक आपत्ती घटकांतर्गत सात लाख ३५ हजार ८११ अर्जदार शेतकऱ्यांना ४६१ कोटींचा पीकविमा परतावा मंजूर केला. यापैकी पहिल्या टप्प्‍यात ७३ टक्क्यांनुसार ३३० कोटींचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला. यानंतर उर्वरित २७ टक्क्यांनुसार ३३१ कोटींचा विमा हप्ता प्रलंबित होता. या बाबत जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी विमा कंपनीकडे पाठपुरावा करण्यात आला. सध्या शिल्लक १३१ कोटींचा विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासन, कृषी विभागाच्या सूत्राने दिली.