Two thousand notes printed by a jeweler in Mumbai; 40 lakh counterfeit notes seized from Hotel Madhuva

कॅश डिपॉझिट मशीनमध्ये मित्राच्या खात्यात बनावट नोटा भरून तीन हजार कमवू, अशी शक्कल लढवणारा युवक सतर्क बँक कर्मचारी आणि सीसीटीव्ही फुटेजमुळे अलगद सापडला. धक्कादायक बाब म्हणजे तो युवक बँक अधिकारीचं निघाला.

    इस्लामपूर : कॅश डिपॉझिट मशीनमध्ये मित्राच्या खात्यात बनावट नोटा भरून तीन हजार कमवू, अशी शक्कल लढवणारा युवक सतर्क बँक कर्मचारी आणि सीसीटीव्ही फुटेजमुळे अलगद सापडला. धक्कादायक बाब म्हणजे तो युवक बँक अधिकारीचं निघाला. आपल्या जवळ बनावट नोटा आहेत हे माहीत असतांना त्याने गुन्हा केला आणि तो तुरूंगात गेला.

    एचडीएफसी बँकेचा अधिकारी संग्राम सदाशिव सूर्यवंशी (वय ३०, रा.कामेरी, ता. वाळवा) याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे . पोलिसांनी त्याला अटक केली असून २३ मेपर्यंत त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

    एचडीएफसी बँकेच्या अधिकाऱ्याने ५०० रुपयांच्या सहा बनावट नोटा आयसीआयसीआय बँकेच्या मशिनमध्ये जमा करून बनावट नोटा वापरात आणण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा इस्लामपूर पोलीस ठाण्यात नोंद झाला . हा प्रकार इस्लामपूर येथील आयसीआयसीआय बँक शाखेत घडला. याप्रकरणी शाखा उपव्यवस्थापक रवींद्र आबासाहेब महाले यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.

    शनिवारपासून सोमवारपर्यत बँकेला सुट्टी असल्याने महाले व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी नेहमी प्रमाणे बँकेच्या कॅश डिपॉजिट मशीन मधील कॅश काढली. त्यावेळी या मशीनमधील एका वेगळ्या बॉक्समध्ये ५०० रुपयांच्या ६ नोटा जमा झाल्या होत्या. त्या दोन सिरीयल नंबरप्रमाणे नोटा झेरॉक्स असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर महाले यांनी डिपॉजिट रक्कमेचा रिपोर्ट काढल्यानंतर या नोटा विशाल विश्वकांत मोरे (रा. नवेखेड) यांच्या खात्यात जमा झाल्याचे निदर्शनास आले. यावेळी मोरे यांना तात्काळ बँकेमध्ये बोलावून घेतले.

    मोरे यांच्याकडे या नोटाबाबत चौकशी करण्यात आली. त्यावेळी मोरे यांनी या नोटा मी मशीनमध्ये टाकल्या नाहीत, असे सांगितले. बँकेच्या अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज काढून पाहिले असता एक इसम तोंडाला मास्क लावून एटीएम सेंटरमध्ये येवून डिपॉझिट मशीनमध्ये पैसे डिपॉझिट करीत असल्याचे दिसून आले.

    याबाबत विशाल मोरे यांच्याकडे चौकशी केली असता, हा त्यांचा मित्र संग्राम सुर्यवंशी असल्याचे व तो इस्लामपूर येथील एच.डी.एफ सी बँकेमध्ये काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. पैसे डिपॉझिट करण्यापूर्वी सुर्यवंशी याने मोरे यांच्या खात्यावर पैसे पाठवतो, व ते पैसे माझ्या खात्यावर ऑनलाईन पाठव असे सांगितले होते. पण पैसे काही आले नाहीत. त्यानंतर मोरे यांनी सुर्यवंशी याला बोलावून घेतले व या नोटा तु एटीएममध्ये जमा केल्या आहेस का अशी विचारणा केली असता त्याने नाही म्हणून सांगितले.

    दरम्यान, महाले यांनी ते सिसिटिव्ही फुटेज बँक मॅनेजर योगेश जोशी यांना दाखवले. त्यावेळी त्यांनी पोलीसांत तक्रार द्या, असे सांगितले. पोलीसांनी मोरे व सुर्यवंशी यांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. त्यावेळी सुर्यवंशी याने या नोटा मी मोरे यांच्या खात्यावर टाकल्या असल्याची कबुली दिली. याप्रकरणी इस्लामपूर पोलीस ठाण्यात भा.द.वि.स. कलम ४८९ कलमानुसार सुर्यवंशी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

    अखेर बिंग फुटले…!

    बनावट नोटा भरताना संग्राम सूर्यवंशी याने तोंडाला मास्क लावला होता. एटीएम सेंटरमध्ये येवून डिपॉझिट मशीन मध्ये त्याने बनावट नोटा डिपॉझिट केल्या. त्याचदरम्यान त्याने आपल्या मित्राला खाते नंबर विचारत त्याच्या खात्यात हे पैसे भरले. हे पैसे जमा झाल्यावर मला पुन्हा परत ऑनलाईन दे असे सांगणाऱ्या सूर्यवंशी याचे बिंग अखेर फुटले.