बाप्पा! ‘त्या’ एका व्यक्तीला सोडून सर्वांना सद्बुद्धी दे…; जरांगे पाटलांचे दगडूशेठकडे साकडे

मनोज जरांगेंनी पुण्यातील सभेनंतर श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले. जरांगेंनी दगडूशेठ गणपतीची मनोभावे आरती केली. श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या ट्रस्टतर्फे जरांगेचा सन्मान करण्यात आला.

    पुणे : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात केली आहे. पुण्यातील खराडी परिसरात मनोज जरांगे यांची जाहीर सभा पार पडली. मनोज जरांगेंनी पुण्यातील सभेनंतर श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले. जरांगेंनी दगडूशेठ गणपतीची मनोभावे आरती केली. श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या ट्रस्टतर्फे जरांगेचा सन्मान करण्यात आला.

    त्यानंतर माध्यमांनी त्यांना दगडूशेठ गणपतीकडे काय मागितले, असा प्रश्न केला. यावेळी एक व्यक्ती सोडून सगळ्यांना सद्बुद्धी दे, अशी प्रार्थना बाप्पाकडे केली. कारण त्या व्यक्तीला सद्बुद्धी मिळणारच नाही असं मनोज जरांगे यावेळी बोलताना म्हणालेत. दरम्यान, मनोज जरांगे यांनी कोणत्या एका व्यक्तीला सोडून सगळ्यांना सद्बुद्धी दे अशी प्रार्थना बाप्पाकडे केली यावरून अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.

    तर अल्टीमेटमबाबत बोलताना ते म्हणाले की, कोणी काही म्हणो, आम्ही मात्र २४ डिसेंबरवर ठाम आहोत. मराठ्यांना कुणबी दाखले मिळत आहेत, त्याबद्दल आम्ही समाधानी आहोत. २४ डिसेंबर पर्यंत सगळ्यांना दाखले मिळतील असा विश्वास आहे.