शिवतारेंची मुख्यमंत्री शिंदेंनी केली मनधरणी; अजित पवार देखील उपस्थित

विजय शिवतारे हे बारामतीमधून निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर ठाम होते. आता मात्र विजय शिवतारे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनधरणी केली आहे.

    मुंबई – आगामी लोकसभा निवडणूकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. यामध्ये सर्वांचे खास करुन लक्ष बारामती लोकसभा मतदार संघाकडे लागलेले आहे. या मतदार संघामध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे.  दरम्यान, बारामतीमध्ये शिंदे गटाचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी रिंगणात उडी घेतली. महायुतीमध्ये सामील असूनही शिवतारे यांनी अजित पवार यांच्यावर जहरी टीका केली. शिवतारे हे बारामतीमधून निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर ठाम होते. आता मात्र विजय शिवतारे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनधरणी केली आहे.

    महायुतीमध्ये असताना देखील शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. त्यांच्या या भूमिकेनंतर महायुतीमध्ये मीठाचा खडा पडला होता. यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी आमदार विजय शिवतारे यांना वर्षा बंगल्यावर बोलावून घेतले. आणि त्यांची मनधरणी केली आहे. याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे. या भेटीवेळी विजय शिवतारे यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते. फोटोमध्ये अजित पवार स्मितहास्य करताना दिसत आहे. त्यांच्या या फोटोवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत.

    माजी आमदार विजय शिवतारे यांनी वर्षा बंगल्यावर भेट घेतल्यानंतर बारामतीची लढाई ही तिहेरी न होता दुहेरी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र शिवतारे यांनी आपला निर्णय अद्याप जाहीर केलेला नाही. उद्या (दि.29) विजय शिवतारे पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेमध्ये ते आपली भूमिका मांडणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनधरणीचा योग्य परिणाम होणार की शिवतारे आपल्या भूमिकेवर ठाम राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.