‘८० टक्के आमदार माझ्याबरोबर तरी मी पक्ष कसा चोरला?’ अजित पवारांचा ‘काकांना’ सवाल

अजित पवार यांनी बारामती दौऱ्यावेळी शरद पवारांसह विरोधकांवर जोरदार टीका केली.

    बारामती: अजित पवार यांनी बारामती दौऱ्यावेळी शरद पवारांसह विरोधकांवर जोरदार टीका केली. बारामती शहरातील जिजाऊ भवन या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामती शहर व तालुका आजी-माजी पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अजित पवार म्हणाले, “मी पक्ष चोरला असल्याची टीका वारंवार माझ्यावर केली जाते, मात्र पक्षातील 80 टक्के आमदार माझ्या विचाराला साथ देऊन माझ्याबरोबर येत असतील तर मी पक्ष कसा करू शकतो? असा सवाल करत चार दिवस सासूचे असतात, तसेच सुनेचे ही चार दिवस असतात, त्यामुळे सासू सासऱ्यांनी आता शांत बसण्याची गरज असल्याची” उपरोधिक टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांचे नाव न घेता केली.

    सतत तुम्ही म्हणाल तेच बरोबर

    तसेच उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, “पुढच्या पिढीने पक्षाचे काम हातात घेतले याचा अर्थ त्यांनी पक्ष चोरला असं होत नाही. आम्हीही पक्षासाठी योगदान दिलेले आहे. त्यामुळेच पक्षातील ८० टक्के आमदार माझ्यासोबत येतात, आमच्या विचाराची भूमिका घेतात, याचा अर्थ कुठेतरी काहीतरी योग्य घडत असेल, म्हणूनच ते आमदार येतात ना? सतत तुम्ही म्हणाल तेच बरोबर असे दरवेळेस कसे चालेल?”आज तुम्हाला जे भावनिक करत आहेत, त्यांच्या हातात केंद्रातील काहीच नसेल तर ते काय तुमचा विकास करू शकणार असा सवाल त्यांनी  शरद पवार व सुप्रिया सुळे यांचा नामोल्लेख टाळून केला.

    म्हाताऱ्या बैलाला बाजार दाखवा

    माजी राज्यमंत्री दादा जाधवराव ६९ वर्षाचे असताना, पुरंदर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांना बैल म्हातारा झाला असल्याचे म्हणत, म्हाताऱ्या बैलाला बाजार दाखवा, असे आवाहन त्यांनी केले होते, आठवण दादा जाधवराव यांनी आपणास करून दिली होती, असे सांगत शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्ष टीका अजित पवार यांनी यावेळी केली. बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये माहितीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना मतदारांनी संधी दिल्यास या मतदारसंघाचा खऱ्या अर्थाने आपण कायापालट करू. आपण केवळ भाषण करत नाही तर काम ही करून दाखवतो, कामाची धमक आपल्यात आहे. ही निवडणुक देशातील जनतेच्या भवितव्याची आहे. सुरुवातीला आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात प्रचार केला. मात्र पंतप्रधान मोदी यांनी जगामध्ये भारताचा नावलौकिक वाढवला आहे, हे त्रिवार सत्य आहे. पुलवामा घटनेमुळे पाकिस्तानचं कंबरड मोडलं, त्यामुळे पाकिस्तानसह अन्य राष्ट्र भारताकडे वाकड्या नजरेने पाहत नाहीत.परदेशातील नागरिक देखील त्यांचे मोठ्या प्रमाणावर स्वागत करतात.बारामती विधानसभा मतदारसंघात मतदारांनी काय निर्णय घ्यायचा हे त्यांनी ठरवायचे आहे,’ असे आवाहन अजित पवार यांनी केले.