‘मी नात्याचा आणि पदाचा सन्मान केला, पण…’, सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली खंत

शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी सभेमध्ये खंत व्यक्त केली आहे.

    बारामती – लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. राज्यातील पाच मतदारसंघामध्ये मतदान होत आहे. इतर मतदारसंघामध्ये  प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. पवार कुटुंबातील दोन उमेदवार असल्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघाची रंगत आणखी वाढली आहे. त्याचीबरोबर बारामतीची लढाई ही प्रतिष्ठेची होणार आहे. शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी सभेमध्ये खंत व्यक्त केली आहे.

    सुप्रिया सुळे यांनी बारामतमधील कन्हेरी मारुती मंदिरात प्रचाराचा नारळ फोडला. यानंतर बारामतीमध्ये घेण्यात आलेल्या सभेमध्ये त्यांनी बारामतीकरांशी संवाद साधला. यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या ‘मला काही जण म्हणले होते मी बारामतीमध्ये कमी येते. पण असं ठरलं होतं की मी दिल्लीत असणार आणि बाकीची कामं इथले लोकं करणार. मी नात्याचा सन्मान केला, पदाचा सन्मान केला, पण आता हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा. झालं गेलं गंगेला वाहिलं. पण आता बदल करावा लागेल. आपली वैचारिक लढाई आहे वैयक्तिक नाही’, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी खंत व्यक्त केली.

    सुप्रिया सुळे यांनी पुढे सांगितले की, ‘माझं काम आणि मेरिट बघून मला संधी द्या. बारामतीची निवडणूक अमेरिकापर्यंत पोहचली आहे. न्यूयॉर्क टाईमचे पत्रकार २ दिवसांपासून बारामतीमध्ये आले आहेत. मी एक पुस्तक विरोधकांना पाठवणार आहे. ज्यात मी काय काय काम केलं हे दाखवणार आहे. उद्या जे जे कन्हेरीमध्ये येतील ते मलाच मतदान करतील.’ असे देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.