बारामती -नीरा मार्गावरील शारदानगर परिसरातील चिंच बनावर कुऱ्हाड; हिरवळीने नटलेला परिसर झाला ओसाड

    बारामती: बारामती शहराच्या लगत असलेल्या बारामती निरा मार्गावरील शारदानगर परिसरातील चिंच बनावर अखेर कुऱ्हाड पडली असून या ठिकाणची अनेक झाडे जमीन दोस्त केल्याने हिरवळीने नटलेला हा परिसर ओसाड झाला आहे.बारामती निरा या मार्गाचे रूपांतर राष्ट्रीय महामार्गात झाले असून या महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. नेहमी विविध प्रकारच्या वृक्षांनी तसेच आजूबाजूच्या हिरवळ शेतशिवाराने नटलेला हा महामार्ग प्रवाशांना अल्हाददायक ठरत होता. गेल्या काही दिवसांपूर्वी या महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे.

    शारदानगर शैक्षणिक संकुलाच्या पुढे या महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू झाले आहे. मात्र शारदानगर शैक्षणिक संकुलाच्या अलीकडच्या बाजूला या महामार्गाच्या दुतर्फा असलेले चिंचबन या मार्गाचे सौंदर्य वाढवणारे होते. महामार्गाच्या कामामुळे दुतर्फा चिंचेच्या झाडामुळे हा परिसर अधिक सौंदर्याने नटलेला होता. मात्र दोन दिवसांपासून अचानक या ठिकाणी असलेल्या चिंचेच्या झाडाची कत्तल सुरू करण्यात आले असून मोठ्या प्रमाणावरील चिंचेची झाडे तसेच या ठिकाणची अनेक झाडे जमीनदोस्त करण्यात आली आहेत. सध्या या चिंचेच्या झाडाला मोठ्या प्रमाणावर चिंचा लागलेल्या आहेत. अशातच अशा झाडांची कत्तल पर्यावरण प्रेमींना बघणरी नाही. गेल्या अनेक दिवसांपासून ही झाडे महामार्गाच्या कामामुळे तुटणार असल्याची चर्चा होती, त्यामुळे पर्यावरण प्रेमी नागरिक हळहळ व्यक्त करत होते. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील चिंच बनातील ही झाडे तुटली जाणार असल्याने त्यांनी देखील हळहळ व्यक्त केली होती.

    दरम्यान ही झाडे प्रशासनाने काढून आधुनिक पद्धतीने त्याचे रोपण अन्य ठिकाणी करावे, किंवा रुंदीकरण झाल्यानंतर या झाडांची रस्त्याच्या कडेला पुन्हा लागवड करावी, अशी मागणी देखील अनेक नागरिकांची होती. दरम्यान या चिंचेच्या झाडाखाली अनेक रसवंतीगृह व्यावसायिक आपला उदरनिर्वाह करत आहेत. या रस्त्याने प्रवास करणारे या चिंच मनात थांबून विश्रांती घेत उसाचा रस घेत होते. मात्र ही चिंचेची झाडे तोडण्यास सुरुवात झाल्याने या रसवंतीगृहचालकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे.