मॉडीफाय सायलन्सरवर दंडुका..! वाहतूक पोलिसांची तब्बल ‘इतक्या’ बुलेटवर कारवाई

पुणे शहरभर बुलेटला मॉडीफाय सायलन्सर लावून कर्कश आवाज काढत फिरणाऱ्यांविरोधात वाहतूक पोलिसांनी दंडूका उगारला आहे. ध्वनी प्रदुषण करणाऱ्या तब्बल ६१९ दुचाकी चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे.

    पुणे : पुणे शहरभर बुलेटला मॉडीफाय सायलन्सर लावून कर्कश आवाज काढत फिरणाऱ्यांविरोधात वाहतूक पोलिसांनी दंडूका उगारला आहे. ध्वनी प्रदुषण करणाऱ्या तब्बल ६१९ दुचाकी चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे.

    पोलिसांकडून विशेष मोहीम राबवली असून, यापुढेही अचानक अशी कारवाई राबवली जाणार आहे. २७ वाहतूक विभागाअंतर्गत कारवाई करण्यात आली. त्यासोबतच यात दुचाकीचे सायन्सर मॉडीफाय करून देणार्‍या ३१६ जणांवर देखील कारवाई करण्यात आली. तर दुचाकींचे सायलन्सर मॉडीफाईड करणार्‍या गॅरेजवाले तसेच मॉडीफाईड सायलन्सर विक्रेते यांना देखील कारवाईबाबत सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.

    शहरात टवाळखोर दुचाकी चालक तरुणांचा नाहक त्रास सहन करावा लागतो. ट्रिपल शीट तसेच वेडीवाकडी दुचाकी दामटत ते वाहन चालक सुसाट गाड्या चालवितात. त्यांचा त्रास सर्व सामान्यांना होतो. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून आता शहरात बुलेटचा “फटाका “ हा एक नवीनच त्रास पुणेकरांना सहन करावा लागत आहे.

    कॉलेजकुमार आणि टवाळखोर पोरं बुलेटच्या सायलेन्सरमध्ये मॉडीफाय करून कर्णकर्कश्य आवाज करत फिरत असतात. अश्यांवर आता पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. दरम्यान, कोणाला असे बुलेटस्वार किंवा इतर वाहन चालक दिसल्यास पुणे पोलिसांना माहिती कळविण्याचे आवाहन वाहतूक विभागाचे उपायुक्त रोहिदास पवार यांनी केले आहे.