बावडा पोलीस दूरक्षेत्राचा बेकायदेशीर दारू अड्ड्यावर छापा; ७ जण अटकेत

इंदापूर पोलिस स्टेशन अंकित बावडा दूरक्षेत्र हद्दीतील रेडणी, नीरा नरसिंगपूर, गिरवी, गणेशवाडी इत्यादी ठिकाणी देशी-विदेशी व गावठी हातभट्टी दारू विकत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, बावडा पोलीस दूरक्षेत्र विभागाने मोठी कारवाई केली.

    बावडा / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : इंदापूर पोलिस स्टेशन अंकित बावडा दूरक्षेत्र हद्दीतील रेडणी, नीरा नरसिंगपूर, गिरवी, गणेशवाडी इत्यादी ठिकाणी देशी-विदेशी व गावठी हातभट्टी दारू विकत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, बावडा पोलीस दूरक्षेत्र विभागाने मोठी कारवाई केली.

    या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक मुजावर यांच्या आदेशाने सुभाष वामन चव्हाण, नागेश संजय चव्हाण, अजय संभाजी चव्हाण, जयवंत नामदेव हाके (सर्व रा.रेडणी, ता. इंदापूर, जि. पुणे), सयाजी महादेव घोगरे (रा.गणेशवाडी), तानाजी जनार्दन भंडलकर (रा.गिरवी, ता. इंदापूर जि. पुणे), गणेश सहदेव शिंदे (रा.निरा नरसिंगपूर) वरील सर्वजण बेकायदेशीर देशी-विदेशी तसेच पिण्याच्या पाण्याच्या जारमध्ये व प्लॅस्टिक ड्रममधील हातभट्टी, गावठी दारू विक्री करणाऱ्यांवर छापा टाकून १५ हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

    आरोपीस ताब्यात घेऊन बावडा दूरक्षेत्र येथे यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक टी.वाय.मुजावर, सहाय्यक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील, सहाय्यक फौजदार शिंदे, महिला पोलीस हवालदार खंडागळे, पोलीस नाईक कदम, गायकवाड, कळसाईत, पोलीस शिपाई राखुंडे, विशाल चौधर व बारामती आरसीपी पथक सहाय्यक फौजदार तोंडे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी केले.

    बावडा गावावर मात्र मेहर नजर…!

    बावडा परिसरात मोठ्या प्रमाणावर धाडसत्र राबवून कारवाई केली असली तरी बावडा गावात अवैध धंद्यांना प्रचंड उत आला असून, मोठंमोठे धंदे राजरोसपणे सुरू असताना गावात पोलिसांनी फक्त गाड्या फिरवण्याचा रोड शो केला. प्रत्यक्षात गावातील एकाही धंद्यावर कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.