राजघराण्याविषयी बोलताना थोडी तरी लाज बाळगा; खासदार उदयनराजे भोसले यांची संजय राऊत यांच्यावर टीका

सत्तेत राहण्यासाठी ही विकृत लोक पाहिजे ते बरळत आहेत. त्यांचे हे विधान म्हणजे राजकीय स्वार्थाचे विधान आहे. प्रत्येकवेळी काही नसलं की राजघराण्यावर बोलायचं. ज्या घराण्यामुळे तुमचा पक्ष उभा आहे, त्यांच्याविषयी बोलताना थोडी तरी लाज राखा, असा खोचक टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी संजय राऊत यांना लगावला.

सातारा : सत्तेत राहण्यासाठी ही विकृत लोक पाहिजे ते बरळत आहेत. त्यांचे हे विधान म्हणजे राजकीय स्वार्थाचे विधान आहे. प्रत्येकवेळी काही नसलं की राजघराण्यावर बोलायचं. ज्या घराण्यामुळे तुमचा पक्ष उभा आहे, त्यांच्याविषयी बोलताना थोडी तरी लाज राखा, असा खोचक टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी संजय राऊत यांना लगावला.

साताऱ्यात खासदार संजय राऊत यांनी पक्षाच्या पदाधिकारी मेळाव्या दरम्यान छत्रपतींच्या घराण्यावर टीका केली होती. यानंतर आज खासदार उदयनराजे यांनी त्यांच्या विधानाचा समाचार घेतला. उदयनराजे म्हणाले, अलिकडच्या काळात अशी विकृत लोक काहीही बडबडतात. अशा प्रकारच्या विकृती वाढतात, त्यावेळी समाजात क्लेष निर्माण करण्याचे काम केले जाते. त्यांचा हेतू काय हे मला माहिती नाही. ही लोक व्यक्ती केंंद्रीत आहेत. त्यांनी विधान करताना मोजून, मापून, समजून विधान केले पाहिजे. त्यांना मी ओळखत नाही आणि महत्वही देत नाही. लोकशाहीत लोकांचा सहभाग व्हावा, ही संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी मांडणी केली. त्यांनी मांडणी केली नसती तर आजही राजेशाही असती. लोकशाहीच्या धर्तीवर आपला देश सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. मागे हा आम्ही छत्रपतींचे वंशज असल्याचा पुरावा मागत होता. राजकारण करा. आणखी काही करा, प्रत्येकाने आपला पक्ष वाढावा म्हणून प्रयत्न करायला हवेत. पण, दुसऱ्यावर शिंतोडे उडवून तुम्ही फार मोठे होत नाही.

विधान करणारेच मांडीला मांडी लावून बसायचे

ज्यांनी विधान केलं तेच त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत होते. या विकृत लोकाचे सत्तेत राहाणे हेच ध्येय आहे. त्यांच्या निर्लज्जपणाची हद्द झाली आहे. प्रत्येकवेळी काही नसलं की राजघराण्यावर बोलायचं. ज्या घराण्यामुळे तुमचा पक्ष उभा आहे, त्यांच्याविषयी बोलताना थोडी तरी लाज राखा, असा खोचक टोला ही उदयनराजेंनी राऊतांना लगावला.