पूर्ववैमनस्यातून तरूणाला मारहाण करून कोयत्याने वार; घोरपडी पेठेतील घटना

सौरभचा मित्र समीर याला दगड फेकून मारला. त्यानंतर टोळके येथून पसार झाले. पसार झालेल्यांपैकी शेख आणि ससाणे यांना पकडण्यात आले. तर, इतरांचा शोध घेतला जात आहे.

    पुणे : खडक परिसरातील घोरपडी पेठेत पूर्ववैमनस्यातून टोळक्याने तरुणाला बेदम मारहाण करुन कोयत्याने वार (Crime in Pune) केल्याची घटना घडली. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. जुबेर उर्फ वडी शेख व अभिषेक देवीदास ससाणे (वय १८, दोघे रा. लोहियानगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर, राहुल शेंडगे, आदर्श हनवते, रोहित थोरात यांच्यावर खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत सौरभ धावरे (वय २३, रा. घोरपडी पेठ) याने तक्रार दिली आहे. तो या घटनेत गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ आणि आरोपी ओळखीचे आहेत. सौरभची आरोपींबरोबर काही दिवसांपुर्वी भांडणे झाली होती. आरोपीने सौरभला अडवले आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याच्यावर कोयत्याने वार केले.

    सौरभचा मित्र समीर याला दगड फेकून मारला. त्यानंतर टोळके येथून पसार झाले. पसार झालेल्यांपैकी शेख आणि ससाणे यांना पकडण्यात आले. तर, इतरांचा शोध घेतला जात आहे. अधिक तपास उपनिरीक्षक सूरज कुतवळ करत आहेत.