केसेस माघारी घे म्हणत पती -पत्नीला मारहाण, 3 जणांवर गुन्हा दाखल; नेमकं काय आहे घटना?

शेतीच्या वादातून केलेल्या केसेस माघारी घे म्हणत पती-पत्नीला तिन जणांनी शिवीगाळ करत लाकडी काठी, गज व दगडाने मारहाण केली. ही घटना दिनांक ११ रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास कुर्डू (ता. माढा) येथे घडली.

    कुर्डुवाडी : शेतीच्या वादातून केलेल्या केसेस माघारी घे म्हणत पती-पत्नीला तिन जणांनी शिवीगाळ करत लाकडी काठी, गज व दगडाने मारहाण केली. ही घटना दिनांक ११ रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास कुर्डू (ता. माढा) येथे घडली. याबाबत मीना हरिदास हांडे (रा. कुर्डू ता. माढा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मधुकर घुगे, दत्तात्रय घुगे, दादा घुगे सर्व (रा. कुर्डू ता. माढा) या तिघांविरुद्ध कुर्डुवाडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी व घुगे यांच्यात शेतीच्या कारणावरून पूर्वी वाद झाला होता. फिर्यादी हांडे यांनी घुगे यांच्याविरोधात तक्रारी नोंदविल्या होत्या. ती तक्रार वारंवार मागे घे म्हणून मधुकर घुगे व फिर्यादी यांच्यात वाद होत होते. गुरुवार दिनांक ११ रोजी फिर्यादी व त्यांचे पती हरिदास हे घराच्या वऱ्हांड्यात झोपले असताना त्यांच्या गावातील मधुकर घुगे, दत्तात्रय घुगे, दादा घुगे हे फिर्यादीच्या घरासमोर येऊन फिर्यादीचे पती हरिदास याला तू आमच्याविरुद्ध केलेल्या माघारी घे नाहीतर तुला बघतो असे म्हणून शिवीगाळ दमदाटी करु लागले.

    दरम्यान त्यावेळी तुम्ही आम्हा शिवीगाळ करु नका असे बोलल्यानंतर मधुकर घुगे याने तिथेच अंगणात पडलेला दगड उचलून फिर्यादीच्या पतीच्या डोक्यात मारला. दादा घुगे याने त्याच्या हातातील लाकडी काठी फिर्यादीच्या डोक्यात मारली. दत्तात्रय घुगे याने त्याच्या हातातील गजाने फिर्यादीच्या उजव्या पायावर मारले. त्यावेळी आम्हाल मारु नका असे बोलल्यावर दत्तात्रय घुगे याने फिर्यादीला धक्काबुक्की करुन जखमी करून खाली पाडले. याबाबत फिर्यादी मिना हरिदास हांडे यांच्या फिर्यादीवरुन वरील तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.