
रांजणगाव गणपती (ता.शिरुर) येथील औद्योगिक वसाहतीमध्ये आम्ही माथाडी हमाल पंचायतचे कामगार (Hamal Panchayat) आहे, असे म्हणून वाहनचालकाला मारण्याची धमकी दिली. त्याच्याकडून खंडणी वसूल केल्याची घटना घडली.
शिक्रापूर : रांजणगाव गणपती (ता.शिरुर) येथील औद्योगिक वसाहतीमध्ये आम्ही माथाडी हमाल पंचायतचे कामगार (Hamal Panchayat) आहे, असे म्हणून वाहनचालकाला मारण्याची धमकी दिली. त्याच्याकडून खंडणी वसूल केल्याची घटना घडली. याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे पांडुरंग बबन अभंग, लक्ष्मण गोरडे व महादेव मलगुंडे यांच्याविरुद्ध खंडणीप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
विठ्ठल कचरे हे त्यांच्याकडील वाहनातून कंपनीचे मटेरियल घेऊन करारो इंडिया या कंपनीमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी कंपनीच्या बाहेर वाहन उभे केले असताना पांडुरंग अभंग, लक्ष्मण गोरडे व महादेव मलगुंडे हे तिघे या ठिकाणी आले. त्यांनी कचरे यांना दमदाटी करत ‘आम्ही माथाडी हमाल पंचायतचे कामगार आहे. आमच्याकडून पावती घे, आम्हाला आठशे रुपये दे, नाहीतर तुला गाडी खाली करु देणार नाही, गाडी येथे लावू नको’, असे म्हणून कचरे यांची कॉलर पकडून त्याला मारण्याची धमकी दिली. त्यांनतर कचरे याच्याकडून फोन पेवरून आठशे रुपयांची खंडणी वसूल करुन ‘कोणाला काही सांगितले तर तुला जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी दिली.
याबाबत विठ्ठल बबन कचरे (वय ३६ वर्षे रा. पाडळी लोणंद, ता. खंडाळा, जि. सातारा) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी पांडुरंग बबन अभंग, लक्ष्मण गोरडे व महादेव मलगुंडे (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) यांच्याविरुद्ध दमदाटीसह खंडणीप्रकरणी गुन्हे दाखल केले.