कोण होतास तू काय झालास तू ; लॉकडाऊनने आणली अशी वेळ की…

डोंबिवलीत बाईक चोरीचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढले आहे. या चोरट्यांना गजाआड करण्यासाठी डीसीपी संजय गुंजाळ एसीपी जे डी मोरे यांनी चोरट्यांच्या शोधासाठी विशेष पथके तयार केली. मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक बाईक चोरीचा तपास करीत होते.

    ठाणे : लॉकडाऊनमुळे (Lockdown) काही काम न राहिल्याने एक फॅशन डिझायनर (Fashion Designer) बाईक चोर (Bike Thief) बनला असल्याचे डोंबिवलीत (Dombivli) उघड झाले आहे. धक्कादायक म्हणजे युसुफ खान या फॅशन डिझायनरने चोरीच्या चार बाईक OLX च्या माध्यमातून बनावटी कागदपत्रच्या आधारे आरटीओला फसवत विकल्या. बाईकचे चलान कापल्याने त्याचा मेसेज आल्याने संबंधित व्यक्तीने पोलीस स्थानकात तक्रार दिल्यानंतर मानपाडा पोलिसांनी या चोरटय़ाच्या मुसक्या आवळल्या आहेत.

    डोंबिवलीत बाईक चोरीचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढले आहे. या चोरट्यांना गजाआड करण्यासाठी डीसीपी संजय गुंजाळ एसीपी जे डी मोरे यांनी चोरट्यांच्या शोधासाठी विशेष पथके तयार केली. मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक बाईक चोरीचा तपास करीत होते.

    याच दरम्यान एक चोरी गेलेल्या बाईकचे चलान कापल्याने त्याचा मेसेज ज्या व्यक्तिची बाईक चोरी गेली होती त्याच्या मोबाईलवर गेला. त्या व्यक्तीने याची माहिती मानपाडा पोलिसांना दिली. मानपाडा पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी सुनिल तारमळे यांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. सदर बाईक ही पुण्याचा एक व्यक्ती वापरत होता. पोलिसांच्या पथकाने पुणे गाठत या व्यक्तीकडे चौकशी केली असता त्याने सांगितले रितसर कागदपत्रे तयार करुन ही बाईक विकत घेतली आहे. ओएलएक्सच्या माध्यमातून हा व्यवहार झाला असल्याचे सांगितले.

    सदर बाईक समीर शेख नावाच्या व्यक्तीने बाईक विकल्याचे उघड झाले. मात्र समीर शेख नावाची व्यक्ती अस्तित्वात नसल्याचे पोलिस तपासात उघड झाले. पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवत सापळा रचत अखेर युसूफ खानला अटक केली .युसुफ खान हा डोंबिवली येथील पलावा सिटीत राहणारा फॅशन डिझायनर होता. लॉकडाऊनमध्ये त्याला काम नसल्याने तो बेरोजगार होता.

    पैशांसाठी त्याने बाईक चोरी करण्याचे ठरवत चार बाईक चोरल्या. चारही बाईकची खोटी कागदपत्रे तयार करुन ओएलएक्सच्या माध्यमातून चारही बाईक विकल्या. युसुफ खान याने बाईक विकत घेणाऱ्याचा नाही तर बनावटी कागदपत्र बनवत त्या गाड्या आरटीओमध्ये पासिंग करून आरटीओचीही फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. सध्या युसुफ खानला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. अजून किती बाईकची चोरी केली आहे याचा तपास मानपाडा पोलीस करीत आहेत.