‘या’ कारणामुळे यंदा स्ट्राॅबेरीला मागणी नाहीच; व्यापारी चिंतेत

ढगाळ आणि पावसाळी वातावरणामुळे यंदा स्ट्राॅबेरीच्या लागवडीवर परिणाम झाला आहे. स्ट्राॅबेरीचा हंगाम सुरू झाला असून, वातावरणातील बदलांमुळे प्रतवारीवर परिणाम झाला आहे. यंदा स्ट्राॅबेरीला फारशी मागणी नसल्याची माहिती फळबाजारातील व्यापाऱ्यांनी दिली.

  पुणे : ढगाळ आणि पावसाळी वातावरणामुळे यंदा स्ट्राॅबेरीच्या लागवडीवर परिणाम झाला आहे. स्ट्राॅबेरीचा हंगाम सुरू झाला असून, वातावरणातील बदलांमुळे प्रतवारीवर परिणाम झाला आहे. डिसेंबर महिन्यात लालचुटूक स्ट्राॅबेरीच्या मागणीत वाढ होते. मात्र, यंदा स्ट्राॅबेरीला फारशी मागणी नसल्याची माहिती फळबाजारातील व्यापाऱ्यांनी दिली.

  दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात स्ट्राॅबेरीचा हंगाम सुरू होतो. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात फळबाजारात स्ट्राॅबेरीची तुरळक आवक सुरू होते. डिसेंबर महिन्यात स्ट्राॅबेरीच्या मागणीत वाढ होते. नाताळ सणात स्ट्राॅबेरीला देशभरातून मागणी असते. स्ट्राॅबेरीची लागवड सातारा जिल्ह्यातील वाई, महाबळेश्वर, पाचगणी, भिलार परिसरात होते. पुणे जिल्ह्यातील भोर तालुका, तसेच गेल्या काही वर्षांपासून नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी स्ट्राॅबेरीची लागवड करण्यास सुरुवात केली आहे. थंडीत स्ट्राॅबेरीची लागवड चांगली होते, असे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील स्ट्राॅबेरी व्यापारी सुभाष राऊत यांनी सांगितले.

  स्ट्राॅबेरीचा हंगाम सुरू झाल्यानंतर यंदा कडाक्याची थंडी पडली नाही. नोव्हेंबर महिन्यात पाऊस झाला. ढगाळ वातावरण, वातावरणातील उष्मा, तसेच थंडी न पडल्याने स्ट्राॅबेरीच्या लागवडीवर परिणाम झाला आहे, असे त्यांनी नमूद केले. दरवर्षी फळबाजारात डिसेंबर महिन्यात स्ट्राॅबेरीची आवक वाढते. मार्केट यार्डातील फळबाजारात साधारणपणे पाच ते सात हजार प्लास्टिक ट्रेची आवक वाई, महाबळेश्वर, भिलार भागातून होते.

  यंदा स्ट्राॅबेरीची लागवड कमी झाली आहे. त्यामुळे बाजारात होणारी आवक अपेक्षेएवढी होत नाही. सध्या बाजारात दररोज दोन हजार स्ट्राॅबेरी ट्रेची आवक होत आहे. एका ट्रेमध्ये पावणेदोन ते दोन किलो स्ट्राॅबेरी असते. घाऊक बाजारात स्ट्राॅबेरीच्या एका ट्रेला १५० ते २०० रुपये दर मिळाले आहेत. गेल्या वर्षी स्ट्राॅबेरीच्या ट्रेला २५० रुपये दर मिळाला होता.

  वातावरणातील बदलाचा फटका स्ट्राॅबेरीच्या लागवडीवर झाला आहे. थंडीत स्ट्राॅबेरीची लागवड चांगली होते, तसेच दर्जाही चांगला असतो. स्ट्राॅबेरीच्या दर्जावर परिणाम झाला आहे. सातारा जिल्ह्यातून स्ट्राॅबेरीची आवक अपेक्षेएवढी होत नाही. भोर तालुक्यातील केळवडे, खेड शिवापूर परिसरातून स्ट्राॅबेरीची आवक बाजारात होत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा स्ट्राॅबेेरीला दरही कमी मिळाले आहेत.

  - सुभाष राऊत, स्ट्राॅबेरी व्यापारी, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड