दरोड्याच्या तयारीतील टोळीला पोलिसांनी केली अटक; तिघांना अटक तर ट्रक जप्त

बीडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीमध्ये आलेल्या टोळीचा डाव गुन्हे शाखेच्या पथकाने उधळून लावला आहे.

    बीड : बीडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (Local Crime Branch) महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीमध्ये आलेल्या टोळीचा डाव गुन्हे शाखेच्या पथकाने उधळून लावला आहे. ही टोळी ट्रकमधून दरोड्यासाठीचे साहित्य (Crime News) घेऊन जात होती. मात्र दरोडा टाकण्याआधीच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचत टोळीला जेरबंद केले.

    पेट्रोल पंपावर दरोडा टाकून रोकड गोळा करण्याच्या उद्देशाने टोळीने तयारी केली होती. दरोडा टाकण्याचे सर्व साहित्य एका ट्रकमध्ये भरले होते. दरोड्याच्या तयारीने ते ट्रकसह पाली शिवारात आल्याची माहिती बीड स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार सापळा रचत स्थानिक गुन्हे शाखेने पाली (ता. बीड) परिसरात मंगळवारी सकाळी ही कारवाई केली. ट्रक ताब्यात घेऊन तिघांना बीड ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन केले. तसेच चार संशयित फरार देखील झाले त्यांचा शोध सुरु आहे.

    पवन आश्रुबा कोळी (वय ४८, रा. पारा, ता. वाशी, जि. धाराशिव) याच्यासह दोन विधीसंघर्षग्रस्त मुलांचा पकडलेल्या संशयितांत समावेश आहे. सचिन आबाराम काळे ऊर्फ आबा रामा काळे (रा. बकरवाडी, ता. वाशी, जि. धाराशिव), मुरली देविदास ऊर्फ पिंट्या शिंदे, दत्ता गोवर्धन शिंदे, राघव ऊर्फ दगल्या आबा शिंदे ( सर्व रा. पारा, ता. वाशी, जि. धाराशिव) हे अट्टल दरोडेखोर आहेत.