
गणपती विसर्जनासाठी गेलेल्या नागरिकांवर मधमाशांनी हल्ला केला आहे. पुण्याच्या भोर तालुक्यातील हिर्डोशी गावात, नीरा देवघर धरण परिसरात हा प्रकार घडला आहे.
पुणे : गणपती विसर्जनासाठी गेलेल्या नागरिकांवर मधमाशांनी हल्ला केला आहे. पुण्याच्या भोर तालुक्यातील हिर्डोशी गावात, नीरा देवघर धरण परिसरात हा प्रकार घडला आहे. हिर्डोशी येथील स्मशानभूमीशेजारी विसर्जनावेळी भाविकांवर मधमाशांनी अचानक हल्ला केला लहान मुलांसह, महिला आणि पुरुष अशा 100 हून अधिक जणांचा मधमाशांनी चावा घेतला. यामुळे एकच गोंधळ उडाला आणि पळापळ झाली. गणपती विसर्जन न करताच अनेकजण निघून गेले.
नेमकं काय आहे घटना?
हिर्डोशी येथील सोमजाईवस्ती, हरळीचा माळ आणि टाकीचा माळ येथील नागरिक शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारस स्मशानभूमी जवळ असलेल्या नीरा देवधर धरणाच्या पाण्यात गणपती विसर्जन केले जाते. त्या ठिकाणी काल विसर्जन मिरवणूक पोहचली. गणपती व गौरी विसर्जनापुर्वी आरती सुरु असताना अचानक मधमाशा आल्या व आरती चालु असतानाच ग्रामस्थांवर हल्ला केला. यावेळी लहान मुले, महिला, पुरुष असे 150 हून अधिक जण उपस्थित होते. मधमाशांनी अचानक हल्ला केल्याने सर्वजण वाट मिळेल तिकडे सैरावैरा पळू लागले.
काही तासाने मधमाशाचा थवा गेल्यावर स्थानिक ग्रामस्थ धोंडिबा मालुसरे, बबन मालुसरे, बबन राजीवडे, अरुण मालुसरे, लक्ष्मण धामुनसे, संतोष मालुसरे, अंकुश धामनसे ग्रामस्थांनी टाकीचा माळ, हरळीचा माळ व सोमजाईवस्ती येथील नागरिकांच्या गणेश व गौरी विसर्जन एकञीत केले. प्राथमिक आरोग्य केंद्रात मधमाशांनी चावा घेतलेल्या नागरिकांवर उपचार करण्यात आले आहेत.