पुण्यातील उतावळे कार्यकर्ते; निकालापूर्वी शहरात विजयाची घोषणा करत फ्लेक्सबाजी

मतदान पार पडलेले असले तरी अद्याप निकाल समोर आलेला नाही. मात्र त्यापूर्वी पुण्यातील उतावळ्या कार्यकर्त्यांनी उमेदवारांच्या विजयाचे बॅनर लावले आहेत.

    पुणे : देशभरामध्ये लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरु आहे. मतदानाचे चार टप्पे पार पडले आहेत. यामध्ये पुणे लोकसभा मतदारसंघाचे मतदान देखील झालेले आहे. पुण्यामध्ये महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर व महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यामध्ये चुरशीची लढाई पहायला मिळाली. मतदान पार पडलेले असले तरी अद्याप निकाल समोर आलेला नाही. मात्र त्यापूर्वी पुण्यातील उतावळ्या कार्यकर्त्यांनी उमेदवारांच्या विजयाचे बॅनर लावले आहेत.

    पुण्यामध्ये सोमवारी (दि.13) मतदान पार पडले. मतदान पार पडल्यानंतर लगेचेच संध्याकाळी महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या विजयाचे बॅनर लावण्यात आले होते. खासदार म्हणून मोहोळ यांचा उल्लेख करण्यात आला होता. त्यानंतर आता महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी देखील उमेदवारांच्या विजयाची घोषणा केली आहे. पुण्यामध्ये मतदानाची टक्केवारी कमी झाल्यानंतर कार्यकर्ते पोस्टरबाजी करत आहेत.

    शहरातील सारसबाग परिसरामध्ये अमित बागुल यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे विजयाचे पोस्टर लावले आहेत. यामध्ये पुणे लोकसभा मतदारसंघातील रवींद्र धंगेकर यांच्यासोबतच बारामतीमध्ये सुप्रिया सुळे, शिरुरमध्ये अमोल कोल्हे यांचा दणदणीत विजय झाल्याचे फ्लेक्स लावण्यात आलेले आहे. यावर ‘महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे उमेदवार मतदारांनी निर्धार करुन मारला शिक्का, खासदार आमचा झाला पक्का, गुलाल आमचाच’ असा उल्लेख केलेला पोस्टर पुण्यामध्ये झळकत आहे.