अंबिका मसाला ब्रॅंड जगभर पोहचविणाऱ्या कमल परदेशी काळाच्या पडद्याआड, ग्रामीण महिलांना एकत्र करून केला होता मोठा उद्योग

अंबिका मसाल्याचा ब्रॅंड जगभर पोहचविणाऱ्या कमल परदेशी यांनी आज अखेरचा श्वास घेतला. पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातील खुटबावमध्ये कमल परदेशी यांनी बचत गटातील महिलांना एकत्रित करून अंबिका मसाला हा ब्रँड तयार केला, त्यानंतर मसाल्याचा ब्रॅंड संपूर्ण जगभरात नेला. नाबार्डच्या माध्यमातून जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल यांना आम्हाला मार्केट उपलब्ध करून द्या, अशी विनंती कमला परदेशी यांनी अँजेला मर्केल यांना केली होती. त्यानंतर जर्मनीत आमच्या अंबिका मलाल्याची विक्री होऊ लागली.

    मुंबई : छोट्याशा खेडेगावातून उद्योगाला सुरूवात करून जगभर ‘अंबिका मसाला’ ब्रँड पोहोचविणाऱ्या उद्योजिका कमल परदेशी यांचं निधन झालंय. वयाच्या ६३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक महिन्यांपासून त्या रक्ताच्या कर्करोगाने त्रस्त होत्या. पुण्यातील ससून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज दुपारच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. अनेक महिलांना छोटे मोठे उद्योग निर्माण करून देणारी उद्योजिका हरपल्याने तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

    कमल परदेशींचा प्रवास अक्षरश: डोळे दिपवणारा
    पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातील खुटबावमध्ये कमल परदेशी यांनी बचत गटातील महिलांना एकत्रित करून अंबिका मसाला हा ब्रँड तयार केला. अल्पावधीतच त्यांचा ब्रँड जगभर पोहोचला. छोट्याशा खेडेगावातून मसाला कंपनी सुरू करून शेकडो महिलांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला. शेतमजूर ते कोट्यवधींची उलाढाल करणाऱ्या अंबिका मसाल्याच्या चेअरमन हा त्यांचा प्रवास अक्षरश: डोळे दिपवणारा ठरला.

    ‘अंबिका’ची परदेशातही मोठी मागणी

    कमल परदेशी यांनी २००० साली खुरपणीच्या मिळणाऱ्या पैशांतून बचत करत ग्रामीण भागातील महिलांना मसाले बनविण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून अंबिका महिला औद्योगिक सहकारी संस्थेची स्थापना केली होती. आज अंबिका मसाल्यांना देशभरातच नाही, तर परदेशातही मोठी मागणी आहे. त्यांचे मसाले पदार्थ सातासमुद्रापार गेले आहेत.

    कमल परदेशी यांचा प्रवास अत्यंत कष्टाचा

    कमल परदेशी यांचा प्रवास अत्यंत कष्टाचा राहिला. उद्योग उभारताना अनेक हालअपेष्टा त्यांना सोसाव्या लागल्या. पण त्या मागे हटल्या नाहीत. त्यांच्या उद्योगासाठी कोरोना काळ प्रचंड त्रासदायक ठरला. पण तरीही त्यांनी नेटाने आपले काम सुरूच ठेवले. अनेक गोरगरीब महिलांना त्यांनी उद्योगाच्या माध्यमातून रोजी रोटी दिली. आपल्या व्यवसायातून महिलांना आर्थिक सक्षम करण्याचं त्यांचे ध्येय शेवटच्या श्वासापर्यंत सुरू होते.