बेलापूर ते मुंबई अवघ्या २५ मिनिटांत; बेलापूर जेट्टीचे मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते उदघाटन, वॉटर टॅक्सी जलवाहतूक आजपासून सेवेत

यापुढे बेलापूर ते मुंबई अंतर २५ मिनिटांत वॉटर टॅक्सीद्वारे नागरिकांना गाठता येणार आहे. त्याचा फायदा नवी मुंबईसह (Navi Mumbai), पनवेल खारघर, उलवे, उरण व रायगडमधील हजारो नागरिकांना होणार असून; या प्रकल्पामुळे नवी मुंबईचे महत्व अधोरेखित झाले आहे.

  • जेट्टी व्हिजनची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या आ. मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश

सिद्धेश प्रधान, नवी मुंबई : बेलापूर जेट्टी (Belapur Jetty) येथील बहुप्रतिक्षित वॉटर टॅक्सी (Water Taxi) आजपासून नवी मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. राज्याचे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय बंदर आणि जलवाहतूकमंत्री सरबानंद सोनोवाल व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वॉटर टॅक्सीचे उदघाटन आज ( गुरुवार दि.१७)  होणार आहे.

त्यामुळे यापुढे बेलापूर ते मुंबई अंतर २५ मिनिटांत वॉटर टॅक्सीद्वारे नागरिकांना गाठता येणार आहे. त्याचा फायदा नवी मुंबईसह (Navi Mumbai), पनवेल खारघर, उलवे, उरण व रायगडमधील हजारो नागरिकांना होणार असून; या प्रकल्पामुळे नवी मुंबईचे महत्व अधोरेखित झाले आहे. जेट्टी व्हिजनची नवी मुंबईत मुहूर्तमेढ रोवणाऱ्या आ. मंदा म्हात्रे यांच्या सातत्त्यपूर्ण प्रयत्नांना यश आले आहे.

२००४ पासून आ. मंदा म्हात्रे यांनी जेट्टीची मुहूर्तमेढ नवी मुंबईत रोवली. जेट्टी व्हिजन राबवत आ. म्हात्रे यांनी नवी मुंबईत पर्यटन वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. आजतागायत नवी मुंबई पर्यटनाच्या बाबतीत काहीसे मागसलेलेच राहिले आहे. ही बाब हेरून व दूरदृष्टी ठेवत आ. म्हात्रे यांनी विविध भागांत  ८ जेट्टी तयार केल्या आहेत. बेलापूर जेट्टी निर्माण करण्याकरिता महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाकडून सर्वप्रथम ८.५ कोटी रुपये मंजूर करून दि.०५ जानेवारी २०२० रोजी बेलापूर जेट्टीचे भूमिपूजन करण्यात आले.

कोविडमुळे लॉकडाऊन असल्याने जेट्टीचे काम संथ गतीने सुरू होते. त्या काळात देखील न थांबता आ. म्हात्रे यांनी अतिरिक्त ४ कोटींचा निधी मंजूर करून घेतला. अखेरीस २०२२ सालात या जेट्टीचे काम पूर्ण झाले असून; जेट्टी उभारण्यासाठी  सुमारे १५ कोटींचा खर्च झाला आहे.

बुधवारी आ. मंदा म्हात्रे यांनी बेलापूर जेट्टीचा पाहणी दौरा केला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, भाजपा प्रभारी संजय उपाध्याय, महामंत्री डॉ.राजेश पाटील, विजय घाटे, दत्ता घंगाळे, श्रीराम घाटे, बाळकृष्ण बंदरे, रविंद्र म्हात्रे तसेच महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे अधीक्षक अभियंता सुधीर देवरे, मुख्य अभियंता राजीव गायकवाड, उपअभियंता प्रवीण पाटील, प्रशांत सानप उपस्थित होते.

बेलापूर जेट्टीतील उपलब्ध सुविधा

बेलापूरवरून थेट मुंबई गाठता येणार

# वॉटर टॅक्सी सुविधा
# प्रवाशांसाठी करमणूक म्हणून उद्यान व फुडप्लाझा
# जेट्टीपर्यंत येण्या-जाण्याकरिता ४ इलेक्ट्रिक बसची व्यवस्था करण्यात येणार आहे.
# प्रशस्त पार्किंग व्यवस्था
# प्रवाशांना बसण्यासाठी आसन व्यवस्था
# भविष्यात क्रुझचा अनुभव देखील नागरिकांना घेता येणार आहे.

जेट्टी सुरू झाल्याने होणारे फायदे

# अवघ्या २५ मिनिटांत बेलापूर जेट्टीतून गाठता येणार मुंबई
# बहुमूल्य वेळ वाचणार
# २०० ते २५० भूमिपुत्रांना रोजगार मिळणार
# रस्ते मार्गावरील वाहनांची रहदारी कमी होऊन प्रदूषणाला व ट्रॅफिकला आळा बसणार
# नवी मुंबईसह खारघर, पनवेल, उरण, उलवेतील नागरिकांना जलवाहतुकीचा पर्याय खुला
# पर्यटनाला मिळणार चालना
# भविष्यात अनेक नवे प्रकल्प येण्याची शक्यता
# आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे बेलापूर जेट्टीचे महत्व अधोरेखित होणार
# येत्या काळात मुंबईसह अलिबाग व कोकणात देखील जलवाहतुक सुरू करण्याच्या उद्देशाने पाऊल उचलले जाणार

बेलापूर जेट्टीचे लोकार्पण होत असल्याने २००-२५० स्थानिक प्रकल्पग्रस्तांना रोजगार मिळणार आहे. जेट्टीपर्यंत येण्या-जाण्याकरिता ४ इलेक्ट्रिक बसची व्यवस्था करण्यात आली असून शेकडो टॅक्सी-रिक्षा यांची आवश्यकता भासणार आहे. नवी मुंबई परीसरात सामान्य नागरिकांची लक्षणीय संख्या पाहता वॉटर टॅक्सीचा प्रवासी दर कमीत कमी असावा अशी मागणीही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आजतागायत नवी मुंबई हे पर्यटनाच्या दृष्टीने मागे राहिले आहे. तामुळेच मी दूरदृष्टी ठेवत जेट्टी व्हिजनचा पाया रचला. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. बेलापूर जेट्टी हे त्याचे जिवंत उदाहरण आहे. त्यामुळे नवी मुंबईत पर्यटन स्थळे विकसित होण्यास मदत व वेग येणार आहे. सध्या  मुंबईपर्यंत जलवाहतूक सुरू होणार आहे. सामान्य नागरिकांना परवडतील असे तिकीट दर ठेवण्याबाबत मी मंत्र्यांना विनंती करणार आहे.

भविष्यात अलिबाग व कोकणात देखील नवी मुंबईकर थेट जाऊ शकतील. यापुढे नेरुळ जेट्टी सुरू होत आहे. तर वाशी येथे होवरक्रोफ्ट सुरू करण्यात येणार आहे. नवी मुंबईला पर्यटन क्षेत्रात अग्रेसर होण्याच्या दृष्टीने मी प्रयत्न करत आहे. याच जेट्टीच्या बाजूला मारीना प्रकल्प उभा राहणार असून नवी मुंबईत पर्यटन स्थळ नाही हा शिक्का कायमचा पुसला जाणार आहे. त्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे.

आ. मंदा म्हात्रे, आमदार, बेलापूर विधानसभा क्षेत्र