मुंबईकरांच्या सेवेसाठी आज धावली मेट्रो, प्रवाशांना कसा होणार फायदा ? रस्त्यावरची वाहतूक कोंडी कमी होणार का ?

मेट्रो 2A आणि मेट्रो 7 मार्गामुळे मुंबईकरांचा (Mumbai Metro) प्रवास आणखी सुलभ होणार आहे. या सुविधेमुळे प्रवाशांचा तासांचा प्रवास काही मिनिटांत पूर्ण होणार आहे.

    मुंबई: मुंबईतील मेट्रो (Mumbai Metro) मार्ग 7 (टप्पा 2) आणि मार्ग 2 अ (टप्पा 2) चे लोकार्पण काल 19 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  यांच्या हस्ते करण्यात आले. तब्बल 12600 कोटी रुपये खर्चाच्या मुंबई मेट्रो मार्गिका 2 अ (Metro 2) आणि 7 चे (Metro 7) लोकार्पण झाल्याने याचा मोठा फायदा मुंबईकरांना होणार आहे. दहिसर पूर्व आणि डीएन नगर (पिवळी लाईन) यांना जोडणारी मेट्रो मार्गिका 2 अ ही सुमारे 18.6 किमी लांबीची आहे. तर अंधेरी पूर्व – दहिसर पूर्व (लाल लाईन) यांना जोडणारी मेट्रो मार्गिका 7 सुमारे 16.5 किमी लांबीची आहे. या दोन्ही मेट्रो लाईन आजपासून सर्वसामान्यांसाठी खुल्या झाल्या आहेत. या मेट्रोमुळे काय फायदा होणार हे जाणून घेऊयात.

    नव्या मेट्रो लाईनमुळे कसा होणार फायदा
    मेट्रो 2A आणि मेट्रो 7 मार्गामुळे मुंबईकरांचा प्रवास आणखी सुलभ होणार आहे. या सुविधेमुळे प्रवाशांचा तासांचा प्रवास काही मिनिटांत पूर्ण होणार आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे ज्या मार्गावर ही मेट्रो उभारण्यात आली आहे तो मार्ग सर्वात वर्दळीचा आहे. अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व असा हा मार्ग आहे. या मुख्य महामार्गावर मेट्रोच्या उभारणीमुळे अंधेरी ते दहिसर दरम्यान राहणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. साधारणपणे सकाळी दहिसरहून मुंबईला येताना 30 मिनिटांचा प्रवास पूर्ण करण्यासाठी एक ते दीड तास लागतो. तर संध्याकाळी ट्रॅफिकमध्ये अडकल्यासही तेवढाच वाया जातो. मात्र आता नवीन मेट्रो लाईन सुरु झाल्याने नागरिकांच्या वेळेची मोठी बचत होणार आहे.

    तिकीट
    मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने मेट्रो 7 आणि मेट्रो 2अ या दोन्ही मार्गिकांच्या तिकीट दरांची घोषणा केली आहे. या मार्गिकांसाठी तिकीट दर 10 रुपयांपासून ते 50 रुपयांपर्यंत असणार आहे. तिकीट दर हे स्थानकांमधील अंतरावर आधारित आहेत.

    -0 ते 3 किमी अंतरासाठी 10 रुपये
    -3 ते 12 किमी अंतरासाठी 20 रुपये
    -12 ते 18 किमी अंतरासाठी 30 रुपये
    -18 ते 24 किमी अंतरासाठी 40 रुपये
    -24 ते 30 किमी अंतरासाठी 50 रुपये

    अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मेट्रो स्टेशन
    या मार्गावर तुमचा अंधेरी पूर्वेकडील गुंदवली स्टेशन ते दहिसर पूर्व असा प्रवास सुरू होईल. यात पहिले स्थानक गुंदवली, त्यानंतर मोगरा, जोगेश्वरी पूर्व, गोरेगाव पूर्व, आरे, दिंडोशी, कुरार, आकुर्ली, पोईसर, मागाठाणे, देवीपाड, राष्ट्रीय उद्यान आणि दहिसर पूर्व हे स्थानक असेल.

    अंधेरी पश्चिम ते दहिसर पश्चिम मेट्रो स्टेशन
    या मार्गावरील तुमचा प्रवास डीएन नगर मेट्रो स्टेशनपासून सुरू होईल. त्यानंतर लोअर ओशिवरा, ओशिवरा, गोरेगाव पश्चिम, पहाडी गोरेगाव, लोअर मालाड, मालाड पश्चिम, वलणई, डहाणूकरवाडी, कांदिवली पश्चिम, पहाडी एकसर, बोरिवली पश्चिम, मंडपेश्वर आयसी कॉलनी कांदरपाडा.