Bengaluru SG Mavericks top the points table in the 5th Tennis Premier League tournament
Bengaluru SG Mavericks top the points table in the 5th Tennis Premier League tournament

  पुणे : क्लिअर पुरस्कृत पाचव्या टेनिस प्रीमियर लीग स्पर्धेत चौथ्या दिवशी बंगळुरू एसजी माव्हरिक्स संघाने 179 गुणांसह अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत चौथ्या दिवशी पंजाब पेट्रीएटस संघाने मुंबई लियॉन आर्मी संघाचा 43-37 असा पराभव तिसरा विजय मिळवला.

  महिला एकेरीत पंजाबच्या कोनी पेरीनचा विजय

  महिला एकेरीत पंजाबच्या कोनी पेरीनने मुंबईच्या सौजन्या बावीशेट्टीचा 11-9 असा, तर पुरुष एकेरीत मुंबईच्या अर्नेस्ट गुलबिसने पंजाबच्या दिग्विजय प्रताप सिंगचा 11-9 असा पराभव करून संघाला बरोबरी साधून दिली. मिश्र दुहेरीत पंजाबच्या कोनी पेरीन व अर्जुन कढे यांनी मुंबईच्या सौजन्या बावीशेट्टी व विजय सुंदर प्रशांत यांचा 12-8 असा पराभव करून संघाला आघाडी मिळवून दिली. पुरुष दुहेरीत अर्जून कढेने दिग्विजय प्रताप सिंगच्यासाथीत मुंबईच्या अर्नेस्ट गुलबिस व विजय सुंदर प्रशांत यांचा 11-9 असा पराभव संघाला विजय मिळवून दिला. सामन्याचा मानकरी अर्जुन कढे ठरला.

  गुजरात पँथर्स संघाचा 46-34 असा पराभव

  दुसऱ्या सामन्यात बंगळुरू एसजी माव्हरिक्स संघाने गुजरात पँथर्स संघाचा 46-34 असा पराभव केला. यावेळी गुजरात पँथर्सचा अँमबॅसिडर अर्जुन कपूरने आपल्या खेळाडूंचा उत्साह वाढविण्यासाठी उपस्थिती लावली होती. महिला एकेरीत गुजरातच्या एकतेरिना यशिनाने बेंगळुरूच्या एरिना रोडीनोवाचा 12-8 असा पराभव करून संघाचे खाते उघडले.

  सुमित नागलचा 14-6 असा पराभव

  पुरुष एकेरीत बंगळुरुच्या रामकुमार रामनाथनने गुजरातच्या सुमित नागलचा 14-6 असा पराभव करून संघाला बरोबरी साधून दिली. मिश्र दुहेरीत बेंगळुरूच्या एरिना रोडीनोवा व विष्णू वर्धन यांनी गुजरातच्या एकतेरिना यशिना व मुकुंद ससीकुमार यांचा 11-9 असा पराभव करून संघाची आघाडी वाढवली.

  पुरुष दुहेरीत बंगळुरुच्या रामकुमार रामनाथन व विष्णू वर्धन यांनी गुजरातच्या सुमित नागल व मुकुंद सासीकुमार यांचा 13-7 अशा फरकाने पराभव केला. बेंगळूरुच्या रामकुमार रामनाथनला सामन्याचा मानकरी पुरस्कार देण्यात आला. 

  तिसऱ्या सामन्यात दिल्ली बिनीज ब्रिगेड संघाने बंगाल विझार्ड्स संघाचा 45-35 असा पराभव केला. विजयी संघाकडून महिला एकेरीत दिल्लीच्या सहजा यमलापल्ली हिने बंगालच्या मारिया तिमोफिवाचा 13-7 असा तर पुरूष एकेरीत दिल्लीच्या डेनिस नोव्हाकने श्रीराम बालाजीचा 12-8 असा पराभव करून आघाडी मिळवून दिली.

  मिश्र दुहेरीत दिल्लीच्या सहजा यमलापल्ली व जीवन नेद्दूचेझियन यांना बंगालच्या मारिया तिमोफिवा व अनिरुध्द चंद्रशेखर यांनी 9-11 असे पराभुत केले. अखेरच्या पुरूष दुहेरीत डेनिस नोव्हाक व जीवन नेद्दूचेझियन यांनी बंगालच्या श्रीराम बालाजी व अनिरुध्द चंद्रशेखर यांचा 11-9 असा पराभव करून संघाला विजय मिळवून दिला. डेनिस नोव्हाक सामन्याचा मानकरी ठरला.

  चौथ्या लढतीत हैद्राबाद स्ट्रायकर्स संघाने पुणे जॅगवॉर्स संघाचा 41-39 असा पराभव संघर्षपूर्ण पराभव केला. विजयी संघाकडून एलेन पेरेझ, रित्वीक बोलीपल्ली व लुकास रोसोल यांनी सुरेख कामगिरी करुन संघाला विजय मिळवून दिला. गुणतक्त्यात चौथ्या दिवस अखेर बेंगळुरू एसजी माव्हरिक्स 179गुणांसह अव्वल स्थानी, तर  पंजाब पेट्रीएटस व बंगाल विझार्ड्स संघ अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी आहेत.