बेस्टची डबल डेकर बस मुंबईकरांसाठी आजही ‘बेस्ट’च; डबल डेकरचा नॉन स्टॉप ८५ वर्षांचा अविस्मरणीय प्रवास

ब्रिटिशकालीन भारतात डबल डेकर बस सुरू करण्याचा निर्णय झाला तेव्हा सर्वप्रथम मुंबईत ही बससेवा सुरू करण्याचा निर्णय झाला. त्याआधीच सर्वसाधारण सिंगल बस अफगाण चर्च ते क्रॉफर्ड मार्केटपर्यंत धावली होती. नंतर सरकार आणि पालिकेच्या आवाहनानुसार बेस्ट कंपनीने १९३४ मध्ये मुंबईच्या उत्तर भागात आपल्या सेवेचा विस्तार केला. त्यानंतर पहिल्यांदा १९३७ मध्ये डबल डेकर बस मुंबईच्या रस्त्यांवर धावली.

  • आता डबलडेकरचा प्रवासही होणार गारेगार

मुंबई: मुंबईच्या (Mumbai) बेस्ट डबलडेकर बसला (Best Double Decker Bus) ८ डिसेंबरला ८५ वर्ष पूर्ण झाली आहेत. ७डिसेंबर १९३७ मध्ये मुंबईत डबलडेकर बस सेवा सुरू झाली होती. बसच्या वरच्या मजल्यावरील पहिल्या सीटवर बसून प्रवासाचा आनंद देणाऱ्या या दुमजली बसला मुंबईकरांकडून मिळालेल्या भरभरून प्रतिसादामुळे आज ही दक्षिण मुंबईतील आगळा रुतबा डबल डेकर लालपरीने टिकवून ठेवला आहे. आता लवकरच डबलडेकर बसचा कायापालट होऊन बेस्टच्या ताफ्यात लवकरच वातानुकुलित इलेक्ट्रिक डबलडेकर बस (Air Conditioned Electric Double Decker Bus) दाखल होणार आहे.

ब्रिटिशकालीन भारतात डबल डेकर बस सुरू करण्याचा निर्णय झाला तेव्हा सर्वप्रथम मुंबईत ही बससेवा सुरू करण्याचा निर्णय झाला. त्याआधीच सर्वसाधारण सिंगल बस अफगाण चर्च ते क्रॉफर्ड मार्केटपर्यंत धावली होती. नंतर सरकार आणि पालिकेच्या आवाहनानुसार बेस्ट कंपनीने १९३४ मध्ये मुंबईच्या उत्तर भागात आपल्या सेवेचा विस्तार केला. त्यानंतर पहिल्यांदा १९३७ मध्ये डबल डेकर बस मुंबईच्या रस्त्यांवर धावली. तेव्हापासून डबल डेकर बसचा प्रवास दिमाखात सुरू आहे. आजही या बसच्या वरच्या मजल्यावरील पहील्या खिडकीतून मुंबईचे नयनरम्य दर्शन घेण्यासाठी मुंबईकर धावपळ करतात.

बेस्टची शान असलेल्या डबलडेकर डिझेल जास्त खात असल्याने तसेच त्या जुन्या झाल्याने त्यांचे मेन्टेनन्स डोईजड झाले होते. त्यामुळे त्या हळूहळू मोडीत काढण्यात येत आहेत. त्यांच्या जागी नव्या इलेक्ट्रीक ९०० डबल डेकर टप्प्या टप्प्याने बेस्टच्या ताफ्यात समाविष्ट होणार आहेत. या बसेसमुळे वायू आणि ध्वनीच्या प्रदुषणातून मुंबईकरांची मुक्तता होणार आहे.

फ्रान्समध्ये बनली पहिली डबल डेकर बस :

मुंबईतील डबल डेकर बस ब्रिटिशकाळात सुरू झाली होती. पण पहिल्या डबलडेकर बसचा शोध किंवा निर्मिती इंग्लंडमध्ये झालेली नाही. तर पॅरिसमधील एका फ्रेंच माणसाने १८२८ मध्ये डबलडेकर बसची रचना केली होती. त्यावेळी ती घोड्याच्या सहाय्याने चालवली जायची.मात्र याचा फायदा इंग्लडने उचलत वर्षभरातच ती लंडनमध्ये आणली. त्यावेळी या बसमध्ये २२ प्रवाशांची आसन क्षमता होती.

वादात सुरू झाली पहिली बेस्ट डबल डेकर बस

भारतात पाहिली बस कुणी सुरू केली यावरून काही वाद देखील झाले आहेत. यात मुंबई आणि तिरुवनंतपुरम या शहरांची पहिली डबकडेकर बससेवा सुरू केल्याचा दावा केला होता. तिरुवनंतपुरम ने सर्वप्रथम १९३८ मध्ये ही बस सुरू केल्याचे म्हटले आहे तर मुंबईचा दावा आहे की, त्या आधी वर्षभर म्हणजे १९३७ मध्येच बस सुरू केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तिरुवनंतपुरममध्ये तत्कालीन शासक, राजा चिथिरा थिरुनल बलराम वर्मा यांनी ही बससेवा सुरू केल्याचे ही त्यांचे म्हणणे आहे.

आकर्षक देखण्या बसचे मुंबईकरांना होते अप्रूप

एकाच वेळी एका बसमध्ये जास्त प्रवाश्यांना नेता यावे यासाठी डबल डेकर बसची रचना आजाराने आणि उंचीने ही छोटी करण्यात आली होती. शहरातील छोट्या रस्त्यांवर ही सहजपणे फिरवता येईल हा ही यामागील उद्देश्य होता. यामुळे या बस वळणाच्या, अरुंद रस्त्यावरही त्या खूप सोयीस्कर ठरल्या होत्या. महत्वाचे म्हणजे डबलडेकर ला लाल रंग देण्यात आला. लंडन मधील खासगी कंपनी ‘लंडन जनरल ऑम्निबस कंपनी’ने सर्वप्रथम त्यांच्या बसेसला लाल रंग दिला. उतार कंपन्यांच्या तुलनेत आपली बस वेगळी आणि उठावदार दिसावी हा यामागील उद्देश्य होता.

सुरूवातीला मुंबईत जागोजागी डबलडेकर बसेस प्रवाशांना सेवा देत होत्या. आजही कुर्ला ते वांद्रे स्थानकादरम्यान काही डबलडेकर बस सुरू आहेत. मुंबईकरांच्या लाडक्या डबलडेकरचा आता कायापालट होऊन प्रवाशांच्या सेवेत लक्झरी डबलडेकर बस पुढच्या वर्षी दाखल होणार आहे.

बेस्ट उपक्रम मकरसंक्रांतीच्या मुहुर्तावर मुंबईकरांना ५० एसी इलेक्ट्रिक डबलडेकर बसची सुविधा देणार आहे. बेस्टच्य ताफ्यात जानेवारीमध्ये ५० एसी डबलडेकर बस येतील त्यानंतर हळूहळू डिसेंबरपर्यंत ९०० इलेक्ट्रिक बसेस ताफ्यात दाखल होणार आहेत. यामुळे जुन्या झालेल्या ४ डबलडेकर गाड्या २०२३ पर्यंत भंगारात काढल्या जाणार आहे. बेस्टने प्रवासी क्षमतेत वाढ करण्यासाठी, प्रदूषणमुक्त प्रवास आणि डिझेल खर्चात कपात करण्यासाठी इलेक्ट्रिक एसी डबलडेकर सेवेत आणण्याचे ठरविले आहे.

नव्या बसची मुंबईकर पाहतात आतुरतेने वाट

  • प्रत्येक नव्या बसमध्ये दोन जिने असतील, जुन्या बसमध्ये फक्त एकच जिना होता.
  • नव्या बसमध्ये डिजिटल तिकीटांची सोय असेल
  • प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातील.
  • नवीन दुमजली बस भारत-६ श्रेणीतील असून या बसमध्ये स्वयंचलित गिअर आहे.
  • बस थांब्याची माहिती देण्यासाठी बसमध्ये इलेक्ट्रॉनिक बोर्ड असतील.
  • दोन स्वयंचलित दरवाजे असतील आणि ते उघडबंद करण्याचे नियंत्रण बसचालकाकडे असेल.
  • प्रवासी वाहून नेण्याची क्षमता अधिक

बस लवकर रस्त्यावर आणा

बेस्ट तोट्यात गेल्याने डबल डेकर बसवर संक्रांत येणार अशी माहिती समोर येत असल्याने याबाबत मुंबईकरांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली. काही ठिकाणी आंदोलने देखील सुरू झाली. मुंबईच्या विकासातील साठी आणि प्रमुख ओळख बनलेली डबल डेकर बंद करू नका अशी मागणी जोर धरू लागली. बेस्ट प्रशासनाने अखेर डबल डेकर बस बंद करत नसल्याचे सांगितले.

इतकेच नाही तर नवीन इलेक्ट्रिक वर चालणाऱ्या अत्याधुनिक डबल डेकर बस ची भर बेस्ट च्या ताफ्यात पाडणार असल्याचे ही सांगितले. यानंतर काही दिवसांतच बेस्टच्या ताफ्यात पहिली इलेक्ट्रिक डबलडेकर दाखल झाली. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते नवीन डबलडेकर बसचे उद्धाटन झाले. याचे मुंबईकरांनी स्वागत केले. डबलडेकरची गौरवशाली परंपरा सुरू राहील याचा आनंद व्यक्त होत आहे.