पर्यटकांसाठी बेस्टची नव्या मार्गावर ‘होप ऑन-होप ऑफ’ सेवा

    मुंबई: बेस्ट उपक्रमाच्या महापालिका करणाला रविवारी होत असलेल्या ७५ वर्षे वर्षामुळे बेस्ट उपक्रमातर्फे ‘अमृतमहोत्सव’ साजरा करण्यात येत आहे. बेस्ट उपक्रमाकडून या निमित्ताने मुंबईकर प्रवाश्यांकरिता विविध योजना सादर करण्यात येत आहेत.त्याचाच एक भाग म्हणून पर्यटकांसाठी नव्या मार्गावर ‘होप ऑन-होप ऑफ’ म्हणजेच ‘हो-हो’ सेवा सुरू करण्यात येत आहे. या सेवेच्या माध्यमातून प्रवाश्यांसाठी वातानुकूलित इलेक्ट्रिक पर्यटन बससेवा उपलब्ध होणार आहे.

    मुंबई शहरामध्ये येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षित आणि किफायतशीर बससेवा पुरवण्याबाबतच्या दृष्टीकोनातून उपक्रमाने हो हो म्हणजेच होप ऑन-होप ऑफ ही वातानुकूलित इलेक्ट्रिक पर्यटन बससेवा सुरू करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दर एक तासाच्या अंतराने कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे.सकाळी ९ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत ही सेवा सुरू असेल.या बससेवेचे पर्यटन शुल्क प्रति व्यक्ती, प्रति बसफेरी सर्व करांसहित १५० रुपये आहे. पर्यटक एखादया पर्यटनस्थळी बसगाडीतून उतरून त्या स्थळाची पाहणी केल्यानंतर पुढच्या फेरीच्या बसगाडीतून पुढील पर्यटन स्थळापर्यंत प्रवास करू शकतात. पर्यटकांना सदर बससेवेव्यतिरिक्त बेस्ट उपक्रमाच्या इतर बसमार्गांचा वापर करून देखील मुंबईतील प्रेसगीय स्थळे पाहता येणार असल्याने ही सेवा प्रवाशांच्या पसंतीस पडेल असा विश्वास बेस्ट प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला.

    ही ‘हो-हो’ बससेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून प्रवर्तित होऊन म्युझियम, गेटने ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह, बाबुलनाथ, पेडर रोड, हाजी अली, महालक्ष्मी रेस कोर्स, धोबी घाट (महालक्ष्मी स्थानक), जिजामाता उद्यान मार्गे जे. जे. एड्डान पुलावरून पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशी चालविण्यात येणार आहे. तरी सर्व पर्यटक, मुंबईकरांनी या किफायतशीर बससेवेचा लाभ घेऊन पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटावा, असे आवाहन बेस्ट प्रशासनाकडून करण्यात येत आहे.