Gram Panchayat Election Results
Gram Panchayat Election Results

Grampanchayat Election Result | ग्रामपंचायत निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालय. 2359 ग्रामपंचायतींपैकी भाजपाने सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेसची मोठी पिछेहाट झाली आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  मुंबई : ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी महायुतीला कौल दिला आहे. मी मतदारांचे आभार मानतो. महाविकास आघाडीने जी कामे थांबवलेली, प्रकल्प रोखलेले त्याला आम्ही चालना देण्याच काम करीत आहे. राज्याच्या सर्वांगीण विकासाच धोरण आम्ही आखले आहे. या राज्यातील सर्वसामान्य माणूस, शेतकऱ्यापासून उद्योजकापर्यंत तरुण, ज्येष्ठ नागरिक, भगिनी या सगळ्यांना न्याय देण्याच काम आमच्या सरकारने केले आहे, अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्रामपंचायत निकालानंतर प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. यात शिंदे गटाने बऱ्यापैकी यश मिळवले आहे. ठाकरे गटावर मात केली आहे.

  मी मनापासून राज्यातील जनतेचे आभार

  ‘शासन आपल्या दारी’ खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहोचले आहे. कृतीतून मतदारांनी हे दाखवून दिले आहे. आपले प्रेम व्यक्त केले. महाविकास आघीडापेक्षा कितीतरी पटीने अधिक सरपंच, सदस्य महायुतीचे उमेदवार निवडून आले आहेत. म्हणून मी मनापासून राज्यातील जनतेचे आभार मानतो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

  जनतेला न्याय देण्याचे काम आम्ही केले

  मी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून आपपल्यापरीने लोकाभिमुख काम करण्याचा, जनतेला न्याय देण्याच काम आम्ही केले आहे” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. “काहींनी फक्त आरोप-प्रत्यारोप आणि टोमणे यामध्ये वर्ष घालवले आहे. वर्षातला एकही दिवस टिका-टिप्पणी करण्याची संधी सोडली नाही. लोकांनी त्यांना नाकारले, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. त्यांचा रोख संजय राऊत यांच्याकडे होता. जे रोज सकाळी पत्रकार परिषद घेऊन भाजपा आणि शिंदे गटावर निशाणा साधत असतात.

  विकासाला आणखी चालना देऊ

  “ज्या लोकांनी मतदारांशी प्रतारणा केली, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली. त्यांना जनतेने घरी बसवलं, त्यांना घरी बसायची सवय होतीच” असा एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना नाव न घेता टोमणा मारला. “आमच्यावर मतदारांच प्रेम आहे, मतदारांचे विश्वास आहे. आमची जबाबदारी वाढली आहे. आणखी काम करून विकास करू. उद्योगधंदे आणून तरुणांना स्वत:च्या पायावर उभं करू. विकासाला आणखी चालना देऊ” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. आधीच्या अडीच वर्षांतील कामगिरी लोकांनी पाहिली, घरी बसून राज्य चालवता येत नाही हे लोकांनी दाखवून दिले आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.