भगतसिंग कोश्यारी महाराष्ट्रासाठी विषारी! ; सुरेश भोर यांची टीका

राज्यपालांच्या प्रतिमेला मारले जोडे

  मंचर : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे कोश्यारी नसून हे महाराष्ट्रासाठी विषारी आहे. ते नेहमीच वादग्रस्त बोलून त्यांना पाठिंबा देण्याचे पाप भाजप सरकार करत असल्याचा आरोप शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरेश भोर यांनी सोमवार (दि. २१) येथे केला.

  राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी  कोश्यारी यांच्या छायाचित्राला जोडे मारण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे  पक्षाच्यावतीने मंचर येथे निषेध मोर्चा काढण्यात आला.  त्यानंतर  छत्रपती शिवाजी महाराज चौकात राज्यपालांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले.

  शिवसेनेचे जिल्हा संघटक अविनाश राहणे, माजी सरपंच दत्ता गांजाळे, दिलीप पवळे,गोविंद काळे, अरुण बाणखेले, प्रवीण टेमकर ,सुवर्णा डोंगरे, विजय शेटे, सुरज हिंगे, विवेक पिंगळे, कलावती पोटकुले यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

  -कोश्यारी यांना भाजपचेच पाठबळ
  शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेश भोर म्हणाले,  राज्यपाल कोश्यारी हे नेहमीच वादग्रस्त विधाने करून महाराष्ट्राचा अपमान करत आहे. त्यांना वठणीव आणण्यासाठी राज्य आणि केंद्रातील सत्ता असलेले भाजप नेते त्यांच्यापुढे मौन बाळगत आहे. त्यामुळे एक प्रकारे भाजपचाच कोश्यारी यांना बोलण्यासाठी पाठिंबा आहे, असे  त्यांनी वारंवार केलेल्या चुकांमुळे दिसून येते. सद्यस्थितीत कोश्यारी हे चुकीचे वक्तव्य करून महाराष्ट्राचा अपमान करत आहे. त्यांचा तातडीने राज्यपाल पदाचा राजीनामा घेऊन त्यांना घरी बसवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. परंतु, त्याकडे भाजप सरकार जाणीवपूर्वक कानाडोळा करत असल्याने कोशाऱ्यांची बोलण्याची मजल वाढल्याचे दिसून येते.

  … तर शिवनेरी ते राज्यपाल भवन  मशाल रॅली
  कोश्यारी यांनी महाराष्ट्राची माफी न मागितल्यास लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी ते राज्यपाल भवन अशी मशाल रॅली काढून त्यांना जाब विचारण्यात शिवसैनिक मागेपुढे पाहणार नाही असा इशाराही सुरेश भोर  यांनी दिला. दरम्यान, यावेळी दिलीप पवळे, कलावती पोटकुले, प्रवीण टेमकर यांनी निषेधपर मनोगत व्यक्त केले.

  गेल्या काही महिन्यांपासून राज्यपाल कोश्यारी हे बेताल वक्तव्य करून छत्रपतींसह त्यांच्या अनुयायांचा अपमान करत आहे. हा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही सावरकरांबद्दल बेताल वक्तव्य केल्याबद्दल त्यांचाही मी निषेध.

  -ऍड. अविनाश राहणे, जिल्हा संघटक, शिवसेना.