
आळंदी : आळंदी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी त्यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली गेली. आळंदी नगरपरिषद, भाईचारा फाउंडेशन, महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दल, महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दल, आळंदी टपरी पथारी, हातगाडी पंचायत अशा विविध सेवाभावी संस्था, रिपब्लिकन सेनेचे वतीने विविध ठिकाणी विविध उपक्रमांचे आयोजन करीत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त साहित्य क्रांती ज्योत वाटेगाव-पुणे मार्गे आळंदी येथे जल्लोषात आणण्यात आली. आळंदीत क्रांतीज्योत आगमनाचे स्वागत करण्यात आले.
भगवानराव वैराट यांची मागणी
यावेळी भगवानराव वैराट, म्हणाले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सर्वांचे आहेत. त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्याची अनेक वर्षांची मागणी असून या मागणीचा जोर सर्वत्र आहे. लोक आग्रह वाढत असून केंद्र सरकारने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार लवकर जाहीर करावा अशी मागणी त्यांनी केली. आळंदी नगरपरिषद, माजी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, माजी नगरसेवक अशोक उमरगेकर आणि आम्ही वेळोवेळी जागेसाठी पाठपुरावा करून जागा निश्चित केली असून येत्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून स्मारकाचे विकास कामासाठी निधी उपलब्ध करून स्मारक लवकर विकसित करण्यास पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. महेश शिंदे यांनी स्मारक विकसित करण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल. यावेळी शिंदे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन प्रवास सांगत लोकांमध्ये जागृती साठी शिक्षण, वाचन महत्वाचे असल्याचे सांगितले. यावेळी हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाचे अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल अर्जुन मेदनकर यांचा सत्कार करण्यात आला.
आळंदी नगरपरिषदेत अभिवादन
आळंदी नगरपरीषद कार्यालयात समाजरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती शासकीय सूचना मार्गदर्शना प्रमाणे साजरी करण्यात आली. यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे प्रतिमेस मुख्याधिकारी कैलास केंद्रे, माजी नगरसेवक अशोक उमरगेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी माजी प्राचार्य नानासाहेब साठे, उद्योजक सुरेश झोंबाडे, सूर्यकांत खुडे, कार्यालयीन अधीक्षक किशोर तरकासे, संतोष सोनवणे, नीलम सोनवणे आदी उपस्थित होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त आळंदी नगरपरिषदेत उपस्थित मान्यवरांनी प्रतिमेचे पूजन, पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले. या प्रसंगी आळंदी नगरपरिषद, आधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.