bhai jagtap

कांजूर मार्ग (Kanjurmarg) येथील प्रस्तावित मेट्रो कारशेड प्रकल्पाची १००३ एकर जागा बिल्डरांच्या घशात घालण्यासाठीच बिल्डरांची दलाली करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो कारशेड प्रकल्प कांजूर मार्गऐवजी पुन्हा आरेमध्येच उभारण्याचा निर्णय घेतला आहे, असा घणाणाती आरोप मुंबई काँग्रेसचे (Mumbai Congress) अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी केला आहे.

  मुंबई: भाजप व शिंदे गटाचे सरकार सत्तेत येते ना येते तोच नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्ध्या तासात पहिला निर्णय घेतला की मेट्रो कारशेड (Metro Car shade) प्रकल्प कांजूर मार्ग ऐवजी आरेमध्येच उभारण्यात यावा. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पर्यावरणाच्या रक्षणासाठी मेट्रो कारशेड प्रकल्प आरेमध्ये (Aarey) न उभारता कांजूर मार्ग येथे करण्याचा निर्णय घेण्यात आला. तो निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा सत्तेत आल्यावर बदलला. आरेमधील जंगल हा मुंबईचा श्वास आहे आणि मुंबईच्या पर्यावरणाचे फुफ्फुस आहे. कांजूर मार्ग (Kanjurmarg) येथील प्रस्तावित मेट्रो कारशेड प्रकल्पाची १००३ एकर जागा बिल्डरांच्या घशात घालण्यासाठीच बिल्डरांची दलाली करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो कारशेड प्रकल्प कांजूर मार्गऐवजी पुन्हा आरेमध्येच उभारण्याचा निर्णय घेतला आहे, असा घणाणाती आरोप मुंबई काँग्रेसचे (Mumbai Congress) अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी केला आहे.

  आज मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप व कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यांच्या नेतृत्वाखाली गोरेगाव येथील आरेमध्ये बनणाऱ्या मेट्रो कारशेड प्रकल्पा विरोधात मुंबई काँग्रेसतर्फे ‘मुंबई बचाव, आरे से मेट्रो कारशेड हटाव आंदोलन’ करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

  पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या या प्रकल्पाविरोधात करण्यात आलेल्या या आंदोलनामध्ये भाई जगताप व चरणसिंग सप्रा यांच्यासोबत माजी खासदार संजय निरुपम, माजी पालकमंत्री अस्लम शेख, आमदार झिशान सिद्दीकी, माजी आमदार अशोक भाऊ जाधव, अभिनेत्री राखी सावंत, मुंबई काँग्रेसचे आजी माजी नगरसेवक, जिल्हाध्यक्ष कलाइव्ह डायस, हुकुमराज मेहता, कालू बुधेलीया, प्रमोद मांद्रेकर, मुंबई काँग्रेसच्या आदिवासी विभागाचे अध्यक्ष सुनील कुमरे, तसेच मुंबई काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते, सामाजिक संस्था, पर्यावरण प्रेमी, पर्यावरण तज्ञ आणि सामान्य मुंबईकर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या आंदोलनादरम्यान मुंबई काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रातील भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. भर पावसामध्ये ३ तास हे आंदोलन सुरु होते.

  भाई जगताप पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मुंबईकरांच्या जीवावर उठले होते आणि आता उपमुख्यमंत्री पदावर असताना सुद्धा मुंबईकरांच्या जीवाशी खेळत आहेत. आरेतील ३३ एकर जागा या कारशेड साठी फडणवीसांनी प्रस्तावित करून ठेवली होती. या ३३ एकर जमिनीवरील २२०० झाडे आजतागायत तोडण्यात आलेली आहेत. उर्वरित जमिनीवरील झाडेही नष्ट करण्याचा त्यांचा मनसुबा आहे. देवेंद्र फडणवीस म्हणतात की, आरेमधून मेट्रो कारशेड प्रकल्प कांजूरमार्ग येथे हलविल्यास सरकारला ५००० कोटी रुपयांचे नुकसान होईल. पण त्यांचा हा दावा अतिशय तथ्यहीन आहे. कारण आरे कारशेड कांजूर मार्ग येथे उभारण्याचा निर्णय घेताना पर्यावरण तज्ज्ञांनी जो अहवाल दिला होता. त्यानुसार कांजूरमार्ग येथे मेट्रो कारशेड प्रकल्प उभारल्यास सरकारला नुकसान न होता उलट १२०० कोटी रुपयांचा फायदा होईल.

  जगतापांनी सांगितलं की, देवेंद्र फडणवीस आरे येथे मेट्रो कारशेड प्रकल्प उभारण्यासाठी यासाठी आग्रही आहेत व बालहट्ट करत आहेत. कारण त्यांचा कांजूरमार्ग येथील आरेसाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या १००३ एकर जागेवर डोळा आहे, ज्यातील ६०० एकर जागा ही राज्य शासनाच्या अखत्यारीतील आहे व उर्वरित केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. ही सर्व जमीन सरकारचेच पैसे वापरून त्यांना गरोडीया बिल्डर व कल्पतरू बिल्डर यांच्या घशात घालायची आहे. हे एक खूप मोठे षडयंत्र आहे. देवेंद्र फडणवीस बिल्डरांच्या फायद्यासाठी हा प्रकल्प करत आहेत. ते स्वतः नागपूरला राहतात. त्यामुळे त्यांना मुंबई व मुंबईकरांची अजिबात काळजी नाही. पण मुंबई काँग्रेस असे होऊ देणार नाही. बिल्डरांची दलाली करण्यासाठी मेट्रो कारशेड प्रकल्प उभारण्यासाठी आरेतील जंगलाचा बळी देऊन मुंबईच्या पर्यावरणाला हानी पोहोचविण्याचा प्रयत्न जर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रातील भाजप सरकारने जर केला, तर आम्ही त्यांचे प्रयत्न हाणून पाडू. यापेक्षाही उग्र आंदोलन आम्ही भविष्यकाळात करू पण आरेला आम्ही नष्ट होऊ देणार नाही.

  मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यावेळेस बोलताना म्हणाले की, आज पुन्हा एकदा आरे ला वाचविण्यासाठी मुंबई काँग्रेस रस्त्यावर उतरले आहे. हा फक्त काँग्रेसचा आवाज नसून संपूर्ण मुंबईकरांचा हा आवाज आहे, त्यांची भावना आहे. जे या काँक्रीटच्या जंगलात राहतात. प्रदूषण, ट्राफिक या समस्येशी नेहमी झगडत असतात. त्यांना जो श्वास घेण्यासाठी जो प्राणवायू मिळतो तो प्राणवायू या आरेच्या जंगलातून मिळतो. हा आरे चा परिसर एक प्रकारे मुंबईला प्राणवायू पुरविणाऱ्या फुफ्फुसाचे काम करतो. या आरे ला नष्ट करण्यासाठी आज पुन्हा एकदा भाजपचे पर्यावरणविरोधी सरकार सज्ज झाले आहे. नरेंद्र मोदी यांचे केंद्रातील भाजप सरकार जे पूर्वी किसान विरोधी होते, युवा विरोधी होते आणि आता ते पर्यावरणविरोधी बनले आहे. कारण सरकार बनते न बनते तोच यांनी मुंबईच्या पर्यावरणाला नष्ट करणारा आरे मध्ये मेट्रो कारशेड प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. ज्यावेळेस महाविकास आघाडीचे सरकार होते, त्यावेळेस त्यांनी निर्णय घेतला होता की, मेट्रो कारशेड प्रकल्प आरेमध्ये न उभारता कांजूर मार्ग येथे उभारण्यात यावा. त्यावेळेस या निर्णयाविरोधात मुंबईकर जनता रस्त्यावर नाही उतरली. पण तिथले बिल्डर या निर्णयाविरोधात न्यायालयात गेले. यावरून हे सिद्ध होते की, हे सरकार फक्त बिल्डर धार्जिणे सरकार आहे. आरेमध्ये या कारशेडला सर्व क्षेत्रातून विरोध होत आहे आणि मुंबई काँग्रेस विरोधात आवाज यापुढेही उठवत राहणार. जनतेला न्याय देणार. ये तो अभी सिर्फ झांकी है, आगे बहोत सारा खेल बाकी है.

  माजी खासदार संजय निरुपम म्हणाले की, आज भर पावसात आपण आरेमध्ये मेट्रो कारशेड प्रकल्प उभारण्याच्या निर्णया विरोधात आंदोलन करत आहोत. कारण जर आरेमधील ही झाडे तोडण्यात आली, तर हा पाऊस सुद्धा मुंबईकरांच्या नशिबात राहणार नाही. मुंबईकरांचे जीवन प्रदूषणाच्या विळख्यातून वाचविण्यासाठी आरेसारख्या वनराईची आवश्यकता आहे. याआधी ज्यावेळेस राज्यात शिवसेना-भाजप चे सरकार होते, त्यावेळेस आरेतील ३० एकर जमिनीवर कारशेड बनविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळेस मी मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष होतो. मुंबई काँग्रेसतर्फे मोठे आंदोलन करण्यात आले, ज्यामध्ये काँग्रेसचं नव्हे तर सर्वसामान्य मुंबईकर सुद्धा सहभागी झाले होते आणि आज पुन्हा एकदा लोकशाहीचा खून करून भाजपचे सरकार आले आणि सरकार बनते न बनते तोच आरेमध्ये मेट्रो कारशेड प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. पण माझे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगणे आहे की, या आधी सुद्धा आम्ही आरे कारशेड विरोधात आंदोलन केले होते आणि आज ही आम्ही आम्ही त्याविरोधात आंदोलन करत आहोत. त्यामुळे काहीही झाले तरी मेट्रो कारशेड प्रकल्प आरेमध्ये होऊ देणार नाही, हा आमचा अंतिम निर्णय आहे, हे देवेंद्र फडणवीस यांनी लक्षात ठेवावे.

  यावेळी माजी पालकमंत्री अस्लम शेख, आमदार झिशान सिद्दीकी, माजी आमदार अशोक भाऊ जाधव व अभिनेत्री राखी सावंत यांनी सुद्धा आपल्या भाषणामध्ये आरेतील मेट्रो कारशेड प्रकल्पाला कडाडून विरोध केला आणि देवेंद्र फडणवीस यांच्या या निर्णयाचा धिक्कार केला.