शिवरायांच्या बाबतीत अवमानकारक वक्तव्य करता.. तुम्हाला लाज वाटायला हवी: भाई जगताप

भाई जगताप म्हणाले, छत्रपती शिवरायांबद्दल जी अवमानकारक वक्तव्ये केली, त्या सर्व वक्तव्याचा महाराष्ट्रातील साडेबारा कोटी जनतेच्यामाध्यमातून आणि मुंबईचा काॅंग्रेस अध्यक्ष म्हणून मी निषेध करतो.

    मुंबई – ”शिवरायांच्या बाबतीत अवमानकारक वक्तव्य करता.. तुम्हाला लाज वाटायला हवी. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुठे आहेत. महाराष्ट्राबद्दल काहीही बोलले जात आहे. जाणत्या राजाबद्दल काहीही बोलले जात आहे. मोकाट सुटलेली भाजपची हिच सडलेली मानसिकता आहे.” अशा तीव्र शब्दात मुंबई काॅंग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींवर जहाल टीका केली.

    महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात संताप असून राज्यपाल कोश्यारी आणि सुधांशू त्रिवेदी टीकेची धनी ठरत आहेत. यात आता मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनीही दोघांवर कडक टीका केली.

    भाई जगताप म्हणाले, छत्रपती शिवरायांबद्दल जी अवमानकारक वक्तव्ये केली, त्या सर्व वक्तव्याचा महाराष्ट्रातील साडेबारा कोटी जनतेच्यामाध्यमातून आणि मुंबईचा काॅंग्रेस अध्यक्ष म्हणून मी निषेध करतो.

    भाई जगताप म्हणाले, सुधांशू त्रिवेदींना मी सांगतो की, ज्या राजाने जनतेचा राजा, रयतेचा राजा म्हणून मान्यता केली आहे असे शिवरायांची जगभर ख्याती आहे. हे त्यांनी लक्षात ठेवावे. ज्या राजाने महिलांचा सन्मान काय असतो हे शिकवले. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची ओटी भरून तिला सन्मानाने पाठवले आहे.

    भाई जगताप म्हणाले, शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लावू नये असे कडक शासन केले. अष्टप्रधान मंडळ स्थापन करून रयतेचे राज्य कसे असू शकते ही लोकशाहीची मुहुर्तमेढही शिवरायांना रोवली होती. गनीमी काव्याने युद्ध जिंकता येते हे सांगत जगाला सूत्र दिले.