भंडारा सामूहिक बलात्कार प्रकरण – पीडितेची प्रकृती गंभीर, आरोपींना पोलीस कोठडी

कनहाडमोह गावाजवळ ३० जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान ३५ वर्षीय महिलेवर वेगवेगळ्या आरोपींनी सामूहिक बलात्कार (Bhandara Gang Rape) केला होता. त्यानंतर ती गावकऱ्यांना गंभीर अवस्थेत महामार्गाच्या शेजारी आढळली होती.

    भंडारा : एका भयानक घटनेमुळे सध्या संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला आहे. भंडाऱ्यात (Bhandara) एका महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. बलात्कार पीडितेची प्रकृती गंभीर आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान या दोन आरोपींना अटक करत घटनास्थळी या प्रकरणाचा तपास सुरु आहे. दोन्ही आरोपींना ८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

    आरोपी अमित सार्वे आणि मोहम्मद अन्सारी या दोघांची चौकशी सुरु आहे. गोंदिया जिल्ह्यातील गोरेगावपासून लाखनीपर्यंत सर्व सीसीटीव्हीच्या आधारावर पोलिसांनी तपास सुरु केला आहे. दरम्यान, या प्रकरणातील एक आरोपी फरार असल्याने त्याचा शोध सुरु आहे. भंडारा जिल्ह्यातील सामुहिक बलात्कार प्रकरणी पीडितेची प्रकृती गंभीर असून सध्या पीडित महिलेवर नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

    भंडारा जिल्ह्यातील कारधा पोलीस स्टेशन अंतर्गत कनहाडमोह गावाजवळ झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडीतेचा रक्तस्त्राव थांबवण्यासाठी डॉक्टरांनी तिच्यावर शस्त्रक्रिया केली आहे. मात्र आणखी काही शस्त्रक्रियाही कराव्या लागू शकतात असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. कनहाडमोह गावाजवळ ३० जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान ३५ वर्षीय महिलेवर वेगवेगळ्या आरोपींनी सामूहिक बलात्कार केल्याचं समोर आलं. पीडित महिला गंभीर अवस्थेत गावकऱ्यांना महामार्गाच्या शेजारी आढळली होती.

    सुरुवातीला पीडितेला भंडाराच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तिची गंभीर अवस्था लक्षात घेत तिला नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर कोलोस्टॉमी शस्त्रक्रिया करण्यात आली.