भंडारी समाजाच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात बविआचा भरणा, घाणेरड्या राजकारणामुळे १५ सदस्यांनी दिला राजीनामा

अनंतराव वामन ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली समाजातील युवकांनी एकत्र येऊन १९७४ ला विश्वस्त मंडळाची स्थापना केली होती.

    वसई – रविंद्र माने : भंडारी समाजाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात समाजाला डावलून बहुजन विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आल्यामुळे संतप्त झालेल्या १५ सदस्यांनी राजीनामा दिल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे तालुक्यामध्ये खळबळ उडाली असून, सदस्यांच्या आक्रमकतेमुळे मंडळाला अखेर कार्यक्रम रद्द करावे लागले आहेत.

    वसई तालुक्यातील शे.क्ष.भंडारी समाज विश्वस्त मंडळ यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. अनंतराव वामन ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली समाजातील युवकांनी एकत्र येऊन १९७४ ला विश्वस्त मंडळाची स्थापना केली होती. कठीण परिस्थितीत घरोघरी फिरून देणग्या गोळा करून पारनाका वसई येथे या समाजाची भव्य वास्तू उभी करण्यात आली आहे. या सुवर्ण महोत्सवाचा खर्च वास्तूच्या उत्पन्नातून केला जात आहे. नोव्हेंबर ते मार्च असे पाच महिने हा सुवर्ण महोत्सव कार्यक्रम चालणार आहे. शनिवारी ११ नोव्हेंबरला दुपारी ४ वाजता लोकनेते आमदार हितेंद्र ठाकुर यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी माजी महापौर राजीव पाटील आणि प्रवीण शेट्टी उपस्थित राहणार आहेत. तर पाच महिन्यांनी होणाऱ्या समारोपाच्या कार्यक्रमाला हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितीज ठाकूर, आमदार राजेश पाटील, प्रवीणा ठाकूर, नारायण मानकर यांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रीत करण्यात आले आहे.

    तशा पत्रिकाही छापण्यात आल्या आहेत. वरील सर्व निमंत्रित हे तालुक्यातील सत्ताधारी बहुजन विकास आघाडीचे पदाधिकारी आणि ठाकूर कुटुंबातील सदस्य आहेत. त्यांना निमंत्रण देताना शे.क्ष.मंडळाच्या अध्यक्षांनी विश्वस्त मंडळाला आणि सदस्यांना विश्वासात घेतले नाही. तसेच मंडळाच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असणाऱ्यांचा आणि समाजातील अनेक कर्तृत्ववान बंधू-भगिनींनी अनेक क्षेत्रात प्राविण्य मिळविलेले त्यांना विश्वस्त मंडळाने प्रमुख अतिथी म्हणून बोलवले नाही, ही भंडारी समाजाची आजपर्यंतची मोठी शोकांतिका आहे. मात्र, अध्यक्षांनी आघाडीच्या नेत्यांना आमंत्रण पत्रिकेत स्थान दिल्यामुळे समाजात या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. शे.क्ष.भंडारी समाजाचा सुवर्ण महोत्सावाच्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका पाहिल्यानंतर सदर कार्यक्रम भंडारी समाजाचा आहे की बहुजन विकास आघाडी या राजकीय पक्षाचा आहे हेच समजत नाही अशी टिका समाज माध्यमांवर करण्यात आली. त्यानंतर या प्रकाराचा निषेध करुन एड.ज्योती ठाकूर यांनी विश्वस्त पदाचा राजीनामा दिला, त्यांच्या पाठोपाठ १४ सदस्यांनी मंडळाचा राजीनामा दिला. सदस्यांच्या या आक्रमक भुमिकेमुळे अध्यक्षाला नमते घेऊन हा कार्यक्रम अखेर स्थगित करावा लागला आहे.