भारत जोडोत डॉ. कदम चालणार ३८४ किलोमीटर; कार्यकर्त्यांचाही उस्फुर्तपणे सहभाग

आमदार डॉ. विश्वजित कदम महाराष्ट्रात भारत जोडो यात्रा मार्गावर ३८४ किमी चालण्याचा निर्धार करून सहभागी झाले आहे. दरम्यान, भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने डॉ. विश्वजित कदम यांच्या बुलडाणा ते सांगली पदयात्रेच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत.

    कडेगाव : ‘एक तेरा कदम, एक मेरा कदम, मिल जाए अपना वतन’ हे ब्रीद घेऊन काँग्रेस नेते राहुल गांधी यांची कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंतची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातून मार्गक्रमण करीत आहे. या यात्रेत सांगली जिल्ह्यातील १२ हजार कार्यकर्ते टप्प्या टप्प्याने सहभागी होत आहेत. या नियोजनात अग्रभागी असलेले पलूस कडेगावचे आमदार डॉ. विश्वजित कदम स्वतः महाराष्ट्रात यात्रा मार्गावर ३८४ किमी चालण्याचा निर्धार करून सहभागी झाले आहे. दरम्यान, भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने डॉ. विश्वजित कदम यांच्या बुलडाणा ते सांगली पदयात्रेच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत.

    जनतेशी संवादाची तार जोडत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात नांदेड, हिंगोली, वाशीम, अकोला, बुलढाणा जिल्ह्यातून जात असली तरी सांगली जिल्ह्यातील कार्यकर्तेही या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. विशेष म्हणजे या यात्रेत विश्वजित कदम यांच्या पलूस कडेगाव मतदारसंघातील ४ हजार कार्यकर्ते पदयात्रेत सामील रवाना झाले आहेत. यापूर्वी संवाद पदयात्रेवेळी मांडलेले दुष्काळ ग्रस्तांचे ज्वलंत प्रश्न सरकारच्या माध्यमातून सोडवण्यात आले. ही संवाद पदयात्रा बार्शी येथे आली असताना राहुल गांधी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पदयात्रेत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. आता तर दस्तुरखुद्द राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा असल्याने कार्यकर्ते अधिक उत्साहाने या यात्रेत सहभागी होत आहेत.

    ती संकल्पनाही राहुल गांधींची

    एक पाऊल संवेदनेचे दुष्काळाच्या सावटातून सावरण्याचे हे ब्रीद घेवून डॉ. विश्वजीत कदम यांनी बुलढाणा ते सांगली अशी संवाद पदयात्रा काढली होती. ही बुलढाणा ते सांगली अशी ५३२ किमी संवाद पदयात्रा काढण्यात आली होती. डॉ. विश्वजित कदम यावेळी युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना व राज्यात पृथ्वीराज चव्हाण असताना काँग्रेसच्या सत्ताकाळात युवक काँग्रेसच्या माध्यमातून राहुल गांधी यांच्या आदेशानुसार कदम यांनी संवाद पदयात्रा काढली. यावेळी युवक काँग्रेसने दुष्काळग्रस्तांच्या व्यथा दुष्काळी भागात जाऊन जाणून घ्याव्या. सरकारच्या दुष्काळग्रस्तांचे प्रश्न सोडविले जावे, अशी राहुल गांधींची त्यामागे संकल्पना होती.