भारत जोडो यात्रा ‘या कारणासाठी’ ठरत आहे लक्षवेधी व आकर्षणाचा केंद्रबिंदू

पहाटे साडेपाच वाजता पदयात्रा सुरू होण्याच्या स्थळी ते तयार असतात. काही क्षणातच राहुल गांधी दाखल होतात. मग "सारे जहाँ से अच्छा.... " या धूनने सलामी दिली जाते आणि पदयात्रेला सुरूवात होते. तर "जन गण मन..." या राष्ट्रगीताच्या धूनने यात्रेला अल्पविराम मिळतो. यात्रा महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन यात्रेकरूंचे निधन झाले. त्या दिवशी श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि दुखवटा पाळण्यासाठी बँड पथकाचे संचलन बंद ठेवण्यात आले होते.

    हिंगोली : काँग्रेस खासदार राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला लोकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, आज लष्करी संचलनाप्रमाणे बिगुल, कवायतीची धून, ताशाचा कडकडाट आणि त्या तालावर अंत्यत शिस्तबद्ध रीतीने ‘लेफ्ट-राईट- लेफ्ट’ करत जाणारे “स्वर्गधारा बँड पथक” भारत जोडो यात्रेत आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. यात्रेत या 14 जणांच्या बँड पथकाला निश्चित असे स्थान आणि ओळख आहे. सर्वात पुढे या पथकाचे संचलन असते आणि मागे त्याच तालावर पाऊले टाकत यात्रा चालते. धून कानावर येताच राहुल गांधी यांची पदयात्रा जवळ आल्याचे गावागावात, चौकात उभ्या लोकांना कळते. हे बँड पथक केरळ मधील स्वर्गधारा चॅरिटेबल ट्रस्टचे आहे. अनेक सार्वजनिक व खासगी समारंभ ते करतात. त्यातून मिळणारे उत्पन्न पथकातील कर्मचाऱ्यांचे पगार आणि शिल्लक रक्कमेतून गोरगरीब मुलांना शिक्षण, गरजूसाठी वैद्यकीय मदत दिली जाते.

    दरम्यान, नौदलाच्या बँड पथकाच्या धर्तीवर या पथकाला खास प्रशिक्षण देण्यात आले आहे. निवृत्त नौदल अधिकारी सिनोय यांनी पाच महिने लष्करी शिस्त आणि संचलनाचे धडे दिले आहेत. नौदलाप्रमाणे सफेद गणवेश, काळे बूट आणि दंडक घेऊन संचलनाचे नेतृत्व करणारा कॅप्टनही आहे. कॅप्टनसह प्रमूख दोन वादक असे तिघेजण संपूर्ण यात्रेसोबत असतील तर उर्वरित सदस्य दर महिन्याला बदलले जातात. आतापर्यंत दोन वेळा सदस्य बदलले आहेत. लांबचा पायी प्रवास आणि सतत वाद्य वाजवत शिस्तबद्ध संचलन केल्याने शरीरावर प्रचंड ताण येत असतो, त्यामुळे यात्रेसाठी एकूण 30 जणांचे नियोजन केले आहे, असे पथकाचे प्रमुख समीर के. यांनी सांगितले.

    पहाटे साडेपाच वाजता पदयात्रा सुरू होण्याच्या स्थळी ते तयार असतात. काही क्षणातच राहुल गांधी दाखल होतात. मग “सारे जहाँ से अच्छा…. ” या धूनने सलामी दिली जाते आणि पदयात्रेला सुरूवात होते. तर “जन गण मन…” या राष्ट्रगीताच्या धूनने यात्रेला अल्पविराम मिळतो. यात्रा महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन यात्रेकरूंचे निधन झाले. त्या दिवशी श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि दुखवटा पाळण्यासाठी बँड पथकाचे संचलन बंद ठेवण्यात आले होते.

    कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत चालणाऱ्या 150 भारतयात्रींसोबत, राहुल गांधी यांचे अंगरक्षक, सीआरपीएफचे जवान, त्यांच्या भोवती राज्य पोलिसांचे ‘डी’ आकारातील सुरक्षा कड्यातील पोलीस पथक, यात्रेचे व्यवस्थान बघणारी दिल्लीची अखिल भारतीय काँग्रेस कमिटीची विशेष टीम आणि त्यांचे खास फोटोग्राफर, यांच्यासह हे बँड पथक सुद्धा न थकता आणि न थांबता मार्गक्रमण करत आहे.