भारतीय जनता पक्षाने लोकाभिमुख कारभार केला – खा. धनंजय महाडिक

भारतीय जनता पक्षाची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे. मोठ्या संख्येने कार्यकर्ते पक्षाकडे आकर्षित होत आहेत. दरम्यान पदावरून पक्षांमध्ये काहीजण जे नाराजी व्यक्त करत आहेत, त्यांची नाराजी निश्चितच दूर करू सगळेजण भाजपसोबत असतील. ज्यांना ज्यांना काम करायचा आहे त्यांना त्यांना पदे देऊ. पद मागणं म्हणजे जिवंतपणाचे लक्षण आहे, अशा शब्दात खासदार धनंजय महाडिक यांनी जिल्ह्यातील भाजप अंतर्गत घडामोडीवर भूमिका मांडली.

    कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे. मोठ्या संख्येने कार्यकर्ते पक्षाकडे आकर्षित होत आहेत. दरम्यान पदावरून पक्षांमध्ये काहीजण जे नाराजी व्यक्त करत आहेत, त्यांची नाराजी निश्चितच दूर करू सगळेजण भाजपसोबत असतील. ज्यांना ज्यांना काम करायचा आहे त्यांना त्यांना पदे देऊ. पद मागणं म्हणजे जिवंतपणाचे लक्षण आहे, अशा शब्दात खासदार धनंजय महाडिक यांनी जिल्ह्यातील भाजप अंतर्गत घडामोडीवर भूमिका मांडली.
    भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे ६ आणि ७ ऑक्टोबर रोजी कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. ६ रोजी दुपारी अडीच वाजता इचलकरंजी येथे त्यांची तीन मतदारसंघासाठी प्रमुख पदाधिकारी, वॉरियर्स यांच्यासोबत बैठक होणार आहे. त्यानंतर इचलकरंजी बाजारपेठेत घर चलो अभियानमध्ये ते सहभागी होणार आहेत. ७ ऑक्टोंबर रोजी सकाळी आठ वाजता करवीर निवासिनी अंबाबाई देवीचे दर्शन घेऊन दौऱ्याला सुरुवात होईल. गडहिंग्लज येथे चंदगड कागल आणि राधानगरी मतदारसंघातील वॉरियर सोबत सकाळी दहा वाजता बैठक आहे. दुपारी बारा ते एक या वेळेत गडहिंग्लज येथील बसवेश्वर महाराज पुतळा ते एसटी स्टँड पर्यंत घर चलो अभियान आहे. त्यानंतर ते कोल्हापूरकडे रवाना होतील. दुपारी साडेतीन वाजता रावजी मंगल कार्यालय येथे कोल्हापूर दक्षिण कोल्हापूर उत्तर, दक्षिण आणि करवीर विधानसभा मतदारसंघातील वॉरियर्स सोबत बैठक आहे. सायंकाळी साडेपाच वाजता घर चलो अभियान अंतर्गत बिनखांबी गणेश मंदिर ते गुजरी कॉर्नर दरम्यान ते नागरिकांना भेटणार आहेत. रात्री हॉटेल पंचशील येथे कोअर कमिटीची बैठक होणार आहे. पत्रकार परिषदेला समरजितसिंह घाटगे, भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा शौमिका महाडिक, जिल्हाध्यक्ष राहुल देसाई, महानगराध्यक्ष विजय जाधव, राहुल चिकोडे, आनंद गुरव, अशोक देसाई आदी उपस्थित होते.

    मोदींच्या नेतृत्वावर विश्वास
    पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षाला वाढता पाठिंबा मिळत आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत देशभरात भारतीय जनता पक्षाचे ३५० हून अधिक खासदार व राज्यांमध्ये ४५ असून अधिक खासदार निवडून आणण्यासाठी महाविजय संकल्प अभियान सुरू आहे. भाजपने लोकाभिमुख कारभार केला असून ते सर्वांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी सध्या दौरे सुरू आहेत. असेही महाडिक यांनी सांगितले.

    भास्कर जाधव यांच्या विधानकडे लक्ष देण्याची गरज नाही
    मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद बदललेल्या बद्दल विचारलेल्या प्रश्नावर बोलताना खासदार महाडिक म्हणाले, मंत्री चंद्रकांत पाटील महाराष्ट्राचे नेते आहेत. त्यांना एका जिल्हा पुरते मर्यादित आपण पाहू नये. त्यांच्याकडे दोन जिल्ह्याची पालकमंत्र्यांची जबाबदारी आहे. त्यांचे प्रमोशन आहे असे ही महाडिक यांनी सांगितले. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी भारतीय जनता पक्षावर दंगली घडवण्याचा आरोप केला होता. त्यावर महाडिक म्हणाले, भास्कर जाधव यांनी जे विधान केले त्याकडे फारसे लक्ष देण्याची गरज नाही. सत्ता गेल्यामुळे ते भडक विधाने करत आहेत.