‘इतर पक्ष संपवून स्वतःचा पक्ष वाढवणं भाजपच्या अंगलट येणार’; भास्कर जाधव यांचे सूचक विधान

शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी देखील भाजपबद्दल सूचक वक्तव्य केले आहे.

    पुणे – आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. लोकसभा व विधानसभा निवडणूकांपूर्वी अनेक नेत्यांनी पक्षांतरे केली आहेत. अनेक विरोधी पक्षातील नेत्यांनी सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावरुन महाविकास आघाडीमधील नेत्यांनी टीकेची झोड उठवली. यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी देखील भाजपबद्दल सूचक वक्तव्य केले आहे.

    पक्ष फोडणे भाजपच्या अंगलट येणार

    शिवसेनेमध्ये बंड झाल्यापासून ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट अशी राजकीय लढत जोरदार सुरु आहे. राज्यातील एकनाथ शिंदे यांचे बंड ऐतिहासिक ठरले. त्यानंतर अजित पवार यांनी देखील राष्ट्रवादी पक्षामध्ये बंड करत भाजपसोबत युती केली. यानंतर ठाकरे गटातील नेत्यांनी जहरी टीका केली आहे. भास्कर जाधव म्हणाले, “शिवसेना हा सर्वांत मोठा प्रादेशिक पक्ष होता आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे राष्ट्रीय पातळीवरील नेते आहेत. पण दोन गुजराती नेत्यांनी मराठी माणसांनाच हाताशी धरून हे दोन्ही पक्ष फोडले. भाजपने स्वत:चा पक्ष मोठा करण्यासाठी जनतेची कामे करून लोकांच्या मनात घर करावे. त्यांचा पक्ष आपोआप मोठा झाला असता. पण त्यांनी इतर पक्ष संपवून त्यांचा पक्ष वाढविण्याचा केलेला प्रकार त्यांच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही,” असे मत ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी व्यक्त केले.

    शिवसेनेला संपवण्यासाठी रचलेले कुभांड जनतेला पटलेले नाही

    कोकणाच्या लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भास्कर जाधव म्हणाले, “भाजपने एकनाथ शिंदेंच्या मदतीने शिवसेना कावेबाज पध्दतीने फोडली आहे, ते कोकणी माणसाला अजिबात पटलेले नाही. कदाचित शिवसेना अशा पध्दतीने फोडली नसती आणि सातत्याने शिवसेनेला निवडून दिल्यानंतर ‘अॅन्टी इन्कम्बन्सी’ झाली असती तर ते नैसर्गिक असले असते. पण शिवसेनेला संपवण्यासाठी रचलेले कुभांड जनतेला पटलेले नाही. त्यामुळे जुने जाणते शिवसैनिक जे मधल्या काळात संघटनेत कार्यरत नव्हते. ते आता सभा, मिरवणुकांना दिसतात. आता जे शिवसेनेच्या नावाने खडे फोडतात त्यांना मुख्यमंत्रीपद शिवसेनेनेच दिले,” असा टोला भास्कर जाधव यांनी लगावला आहे.