
कोरेगाव : छगन भुजबळ मंत्रिमंडळ बैठकीत शांत बसतात, मात्र बाहेर आरक्षणावर बोलतात. ते जातीमध्ये तेढ निर्माण करीत आहेत. त्यांचा बोलविता धनी वेगळाच असून, तुम्ही केवळ जामिनावर बाहेर आहात, असे भाजपने धमकावले असण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केली.
भाजपला घटनाच संपवायची आहे
आमदार जाधव म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली घटना भाजपला संपवायची आहे. विधानसभेचे अध्यक्ष, राज्यपाल, सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीचे प्रमुख हे सर्व घटनात्मक आहेत. त्यांना घटनेने दिलेले अधिकार आहेत. मात्र, भाजपला घटनाच संपवायची आहे. ते थेट घटनेला हात घालू शकत नसल्याने, एक एक करीत ते फांद्या तोडत असून केवळ एक सुळका ठेवू पाहत आहेत. म्हणून आम्ही भाजपला थेट विरोध करीत आहोत. त्यांचे खरे रूप जनतेसमोर आणत असून त्यांचे पितळ उघडे पाडत असल्याचे आमदार जाधव यांनी सांगितले.
हे पदाधिकारी उपस्थित
यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते, उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव, तालुकाप्रमुख सचिन झांजुर्णे, शहर प्रमुख अक्षय बर्गे, अशोकराव भोसले, कोरेगाव बार असो. अध्यक्ष एडवोकेट पी. सी. भोसले यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
आदित्य ठाकरेंवर खोटा गुन्हा
आमदार जाधव म्हणाले, शिवसेना उद्धव गटाचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर चुकीच्या पद्धतीने मुंबई महानगरपालिकेने खोटा गुन्हा दाखल केला आहे. त्याचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत. मात्र आत्ता खऱ्या अर्थाने आदित्य ठाकरे यांना स्टार लागल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
नारायण राणे विस्मृतीत गेलेले नेते
नारायण राणे हे विस्मृतीत गेलेले नेते आहेत. राणे प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा प्रयत्न करतात. ते सातत्याने उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करून मैं भी हू ना दाखवण्याचा प्रयत्न करतात. राणेंची दोन्ही पोरं म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे, अशी टीका अामदार जाधव यांनी केली.