Bhavana Gawli's address cut from Yavatmal-Washim; Candidate given to Rajshri Patil, read in detail

Maharashtra Politics : लोकसभेचे बिगूल वाजल्यानंतर प्रत्येक पक्षातील जागांचा तिढा कायम आहे. शिवसेना शिंदे गटातील भावना गवळी या गेल्या काही दिवसांपासून लोकसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत होत्या. त्यांनी मध्यंतरी हेमंत पाटील आणि हेमंत गोडसे यांच्यासह वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती.

    मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यानुसार हिंगोली आणि यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात अनपेक्षित निर्णय घेण्यात आले आहेत. यवतमाळ-वाशिम मतदारसंघाच्या विद्यमान खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) या पुन्हा एकदा उमेदवारीसाठी इच्छूक होत्या. मात्र, त्यांचा पत्ता कट करण्यात आला असून या मतदारसंघातून हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील (Rajashree Patil) यांना यवतमाळ-वाशिमची (Yavatmal Washim) उमेदवारी देण्यात आली आहे. भावना गवळी यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
    भावना गवळींनी घेतली होती फडणवीस यांची भेट
    भावना गवळी या गेल्या काही दिवसांपासून लोकसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहेत. त्यांनी मध्यंतरी हेमंत पाटील आणि हेमंत गोडसे यांच्यासह वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. दोन दिवसांपूर्वी भावना गवळी नागपूरमध्ये जाऊन देवेंद्र फडणवीस यांना भेटल्या होत्या. त्यानंतर आज सकाळपासून भावना गवळी या वर्षा बंगल्यावर ठाण मांडून बसल्या होत्या. मात्र, एकनाथ शिंदे यांनी यवतमाळ-वाशिममधून भावना गवळी यांच्याऐवजी राजश्री पाटील यांना उमेदवारी देऊ केली आहे. त्यामुळे आता भावना गवळी काय भूमिका घेतात, हे पाहावे लागणार आहे.
    उमेदवारी जाहीर न करता थेट एबी फॉर्म भरणार
    गेल्या काही तासांपासून शिंदे गटातून हिंगोलीसाठी बाबुराव कदम कोहळीकर आणि यवतमाळ-वाशिममधून राजश्री पाटील यांची नावे अचानक चर्चेत आली आहेत. हेमंत पाटील यांना हिंगोलीतून उमेदवारी मिळावी, यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी रात्री वर्षा बंगल्याच्या परिसरात रास्ता रोको केला होता. पण त्याचा काही फायदा झाला नाही. हिंगोलीसाठी शिंदे गटाने बाबुराव कदम कोहळीकर यांचेच नाव निश्चित करण्यात आले आहे. तर राजश्री पाटील यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून लढतील. शिंदे गटाकडून या उमेदवारांची नावे अधिकृतरित्या जाहीर करण्यात येणार नाहीत.  हे दोघेही उद्या थेट निवडणुकीचा एबी फॉर्म भरतील, असे सांगितले जात आहे.