
सातारा : खंडेनवमीनिमित्त खासदार उदयनराजे भोसले यांनी सोमवारी प्रतापगडावरील भवानी मातेची विधीवत व पारंपारिक पद्धतीने पूजन केले आरोग्य धनधान्य समृद्धी नांदू दे, असे साकडे उदयनराजे यांनी यावेळी घातले. यावेळी गडावर विशेष होमहवनाचे आयोजन करण्यात आले होते.
भवानी मातेची विधिवत व पारंपारिक पद्धतीने पूजा
मंगळवारी सातारा शहरासह जिल्ह्यामध्ये विजयादशमी अर्थात दसऱ्याचा पारंपारिक सण साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यातून प्रतापगडावर जाऊन येथील भवानी मातेची विधिवत व पारंपारिक पद्धतीने पूजा केली . यावेळी त्यांच्या समवेत त्यांचे सहकारी काका धुमाळ उपस्थित होते. खंडेनवमीनिमित्त प्रतापगडावरील भवानी मातेचा परिसर मंडप टाकून सजवण्यात आला होता आणि परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आली होती उदयनराजे यांनी सकाळी साडेआठ वाजता आपल्या सहकाऱ्यांसमवेत भवानी मातेची पूजा केली व सर्वत्र आरोग्य धनधान्य समृद्धी नांदू दे असे साकडे घातले .
मंत्रोच्चार हवन सोहळ्यात उदयनराजे यांचा सहभाग
सातारा शहरातील शाही दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर खंडेनवमीनिमित्त दरवर्षी होणारी भवानी मातेची पूजा याचे मोठे महत्त्व आहे यंदाही पारंपारिक पद्धतीने मंत्रोच्चारणामध्ये भवानी देवीचे विधिवत आवाहन करण्यात आले यावेळी आयोजित हवन सोहळ्यात उदयनराजे यांनी सहभाग घेतला होता.
प्रतापगड आणि किल्ले परिसरातील स्थळांचा होणार विकास
पूजा झाल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतापगड आणि लगतच्या परिसराची पाहणी केली राज्य शासनाने प्रतापगड आणि किल्ले परिसरातील स्थळांचा विकास करण्यासाठी प्रतापगड प्राधिकरणाची घोषणा केली असून त्याचे अध्यक्षपद खासदार उदयनराजे भोसले यांना दिले आहे. त्या माध्यमातून परिसरात ऐतिहासिक स्थळांचा कसा विकास करता येईल यासंदर्भात लवकरच प्रस्ताव तयार करून राज्यशासनाला सादर केला जाणार असल्याचे उदयनराजे यांनी सांगितले आहे