भिवंडी लोकसभा निरीक्षक राजनवीर सिंह कपूर यांनी KDMCच्या स्वीप अ‍ॅक्टिव्हिटींची केली प्रशंसा

निवडणूक विषयक सुरू असलेल्या कामकाजाच्या तपशिलाचा आढावा घेतला.

    कल्याण : भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे सर्वसाधारण निरीक्षक राजनवीर सिंह कपूर यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेला भेट दिली. महापालिकेत संपन्न झालेल्या बैठकीत लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीबाबत कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी निवडणूक विषयक सुरू असलेल्या कामकाजाच्या तपशिलाचा आढावा घेतला. महापालिका करीत असलेल्या निवडणुकीच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.

    महानगरपालिकेने दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रावर रॅम्प आणि तत्सम सुविधा पुरवाव्यात तसेच सर्व मतदान केंद्र सुस्थितीत असावेत याबाबतही त्यांनी निर्देश दिले. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी महापालिका करीत असलेल्या स्वीप अ‍ॅक्टिव्हिटींबाबत प्रशंसा करून इतरांनीही मतदानाची टक्केवारी वाढवावी यासाठी अशा प्रकारे स्विप अ‍ॅक्टिव्हिटीं अंमलात आणाव्यात असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

    पुढे ते म्हणाले की, मी केवळ आदेश देण्यासाठी येथे आलो नसून निवडणुकीचे कामकाज आणि कार्यरत अधिकारी कर्मचारी वर्ग यामध्ये मी एक दुवा आहे असे सांगत त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना निवडणुकीच्या कामकाजाबाबत मार्गदर्शन केले. या बैठकीस अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्ता शिंदे, परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, भिवंडी लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव, कल्याण डोंबिवली महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे, माहिती जनसंपर्क विभाग प्रमुख संजय जाधव, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त ढाके आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे सहा निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.