भोसरी, हडपसर शहरी मतदारसंघ ʻशिरुरʼमध्ये निर्णायक

राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस अशी थेट लढाई असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये भोसरी आणि हडपसर हे शहरी मतदारसंघ निर्णायक आहेत.

  दीपक मुनोत – पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस अशी थेट लढाई असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये भोसरी आणि हडपसर हे शहरी मतदारसंघ निर्णायक आहेत. मागील वेळी शिवसेनेत असलेल्या शिवाजीराव आढळराव यांना केवळ भोसरीतून ३७ हजार आणि हडपसरमधून साडेपाच हजार मतांची आघाडी मिळाली. भोसरी, हडपसरचे आजी-माजी आमदार आज महायुतीसोबत आहेत. त्यामुळे भोसरीतून आढळराव यांना एक लाखाचे मताधिक्य देण्याचा भाजपने दावा केला आहे.

  राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. अमोल कोल्हे यांना भोसरी, हडपसरमधून मताधिक्य मिळू शकले नव्हते. मतदारसंघात पाच वर्षे जनसंपर्क न ठेवल्याने आणि सहज उपलब्ध होत नसल्याने कोल्हे यांच्याबाबत ग्रामीण भागात नाराजी आहे. मात्र शरद पवार यांच्याबाबत सहानुभूती आहे. तिचे रुपांतर मतदानात करुन घेण्याचे आव्हान कोल्हे यांच्या पुढे आहे. या मतदारसंघातील ग्रामीणमधील खेड-आळंदी, जुन्नर, आंबेगाव, शिरूर-हवेलीत शरद पवार यांच्याविषयी काही प्रमाणात सहानुभूतीचे वातावरण आहे. पाणी टंचाई , शेतमालाचे पडलेले भाव यामुळे शेतकरी नाराज असून, त्याचा फायदा कोल्हे यांना होईल, असा अंदाज आहे.

  सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील, आमदार दिलीप मोहिते, अतुल बेनके यांना मानणाऱ्या कार्यकत्यांची साथ आढळराव यांना मिळेल त्यामुळे तिन्ही मतदारसंघांतून दोघांनाही साथ मिळेल. निवडणूक चुरशीची होईल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. परिणामी, शहरी मतदार आणि मागील वेळी आढळरावांना साथ देणारे भोसरी हडपसर विधानसभा मतदारसंघ निर्णायक भूमिकेत असणार आहेत. तर शरद पवार यांच्यामुळे कोल्हे यांना ग्रामीण भागातून मतदान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

  शरद पवार यांच्या बाबत सहानुभूती आणि महायुतीसोबत आमदारांची असलेली शक्ती, कोल्हे यांना पाडणारच ही घोषणा खरी करण्यासाठी अजित पवार यांनी पणाला लावलेली ही प्रतिष्ठा हे या मतदारसंघातील राजकारणाचे वैशिष्ट्य आहे.अजित पवार यांनी निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच कोल्हे यांना या वेळी पाडणारच, असे म्हणत थेट आव्हान दिले. मी एखाद्याला पाडणार म्हटले की पाडतोच,असे त्यांचे वक्तव्य होते. शिरूरमध्ये शब्द खरा करून दाखविण्याचे आव्हान पवार यांच्यासमोर आहे.

  राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक – आमदार असलेला शिरूर लोकसभा मतदारसंघ आहे. पक्षात फूट पडल्यानंतर खासदार आणि आमदारांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यापैकी खासदार कोल्हे यांनी शरद पवार यांच्यासोबत राहणे पसंत केले, तर आमदारांपैकी शिरूरचे अशोक पवार वगळता दिलीप वळसे पाटील, दिलीप मोहिते पाटील, अतुल बेनके या आमदारांनी अजित पवार यांना साथ देणे पसंत केले.

  आढळराव यांचा सर्वदूर जनसंपर्क असल्याने अजित पवार यांनी शिवसेनेच्या आढळराव यांना पक्षात घेत उमेदवारी दिली. मोठा जनसंपर्क, अनुभवी असलेल्या आढळराव यांनी डॉ. कोल्हे यांच्या कमी जनसंपर्काचा मुद्दा प्रभावीपणे प्रचारात आणला. पाच वर्षांत कोल्हे मतदारसंघात फिरले नसल्याचे ठासून सांगितले, तर संसदेतील शेतकऱ्यांसाठी, बैलगाडा शर्यतीसाठी भाषणे आणि कामगिरी याचा दाखला देत कोल्हे यांच्याकडून समाजमाध्यमांवरून जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. त्याच वेळी आढळराव यांनी संसदेत उपस्थित केलेल्या मुद्यांवर ही सातत्याने भाष्य करत याकडे साऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

  सरडा आणि पोपट

  आढळराव, कोल्हे यांच्यात मागील काही दिवसांपासून चांगलेच आरोप प्रत्यारोप सुरु आहे. त्यात एकमेकांना उपमा देखील दिल्या जात आहे. सरड्यासारखा रंग बदलता, असे कोल्हे आढळराव पाटील यांना उद्देशून म्हणाले होते. त्यावर आता आढळराव यांनी अमोल कोल्हे यांना प्रत्युत्तर देत पोपटाची उपमा दिली.